नागपूर जिल्ह्यातील फिरत्या आरोग्य केंद्राला मिळणार स्थायी निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:19 PM2018-02-08T23:19:44+5:302018-02-08T23:23:03+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत या पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्याची सुविधा तळागळात पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे. या पथकाकडे स्वतंत्र इमारत नसल्याने आरोग्य सेवा देण्यास अडचणी येत होत्या. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत या पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक सभापती शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी सदस्य जयकुमार वर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदी उपस्थित होते. बैठकीत आशा स्वयंसेविका यांचा अपघात विमा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून काढण्यात येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी २४ मार्च रोजी क्षयरोग दिन साजरा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्षयरोगाचे नोटिफिकेशन बंधनकारक करण्यात आले. खासगी केमिस्टना एच-१ रजिस्टरमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद करून त्याची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले. हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १२००० पैकी ११९९२ रुग्ण तपासण्यात आले असून ५ हत्तीरोग जंतू असलेले रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात नेत्र शस्त्रक्रिया व उपचाराचे वार्षिक उद्दिष्ट ३१०५५ असून जानेवारी महिन्यात ३१६८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.