लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धेतील ‘ब्रेन डेड’ इसमाचे नागपुरात अयवदान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर करून अमरावती येथून यकृत, मूत्रपिंड नागपुरात आणण्यात आले. या दानामुळे दोघांना दृष्टी, तर तिघांना जीवनदान मिळाले.वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी उमेश राधाकिसन अग्रवाल (५२) हे धान्य व्यापारी होते. मंगळवारी त्यांची मोठी बहीण तळेगावला जात होती. त्यांची बहीण आॅटोरिक्षात, तर त्यांच्या मागे दुचाकी घेऊन उमेश अग्रवाल होते. त्या सुखरूप घरी पोहोचल्या; मात्र उमेश अग्रवाल अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना आर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नातेवाईकांनी अमरावती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मेंदू मृत(ब्रेनडेड) घोषित केले. अवयवदानाचा सल्लाही दिला. त्या दु:खातही मानवतावादी भूमिका घेत अग्रवाल कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. त्यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता नागपूर लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल व केअर हॉस्पिटलची चमू अमरावतीत पोहचली. अवयवदान शस्त्रक्रियेला सुरूवात झाली.१५२ किलोमीटरचे ग्रीन कॉरिडॉर‘झेडटीसीसी’च्या परवानगीने अग्रवाल यांचे अवयव ग्रीन कॉरिडॉरने नागपुरात आणण्यासाठी न्यू इरा हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, वोक्हार्ट हॉस्पिटलचे मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, केअर हॉस्पिटलचे मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. प्रकाश केतन व झेडटीसीसीच्या डॉ. विभावरी दाणी अमरावतीत उपस्थित झाल्या. शस्त्रक्रियेनंतर अग्रवाल यांचे यकृत, दोन मूत्रपिंड रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून नागपुरात आणले. १५२ किलोमीटरचा हा प्रवास तासाभरात पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यात वाहतूक पोलिसांनी भरीव मदत केली.न्यू इरा हॉस्पिटलमध्ये १३ वे यकृत प्रत्यारोपण‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी, मूत्रपिंड प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. सी.पी. बावनुकळे, ‘रिट्रायव्हल अॅण्ड ट्रान्सप्लान्टेशन कॉर्डीनेटर’ वीणा वाठोरे यांनी पुढाकार घेतल्याने ४१वे अवयवदान झाले. नियमानुसार न्यू इरा हॉस्पिटलमधील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला यकृत देण्यात आले. या रुग्णालयाचे हे १३ वे यकृत प्रत्यारोपण होते. मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय महिलेला तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ५९ पुरुष रुग्णाला देण्यात आले.