खासदार तडस व जाधव यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकांवर फिजिकल सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:26+5:302021-07-17T04:07:26+5:30
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ...
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस व शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित निवडणूक याचिकांवर ३० जुलै रोजी दुपारी २.३० वाजता फिजिकल सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी शुक्रवारी यासंदर्भात आदेश जारी केला.
तडस हे वर्धा तर, जाधव हे बुलडाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीला अनुक्रमे धनराज वंजारी व बळीराम शिरसकर यांनी आव्हान दिले आहे. दोन्ही याचिकाकर्ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, दोन्ही मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील निवडणूक रद्द करून नवीन निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
तडस व जाधव यांनी या याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. या याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी याचिकाकर्त्यांनी या अर्जांवर उत्तर सादर करणार नसल्याचे आणि हे अर्ज मौखिक युक्तिवाद ऐकून निकाली काढावे, असे न्यायालयाला सांगितले. याशिवाय प्रकरणातील सर्व वकिलांनी या याचिकांवर ऑनलाईन ऐवजी फिजिकल सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायालय येत्या ३० जुलै रोजी या याचिकांवर फिजिकल सुनावणी घेणार आहे.