नागपूर : पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. अद्रक २२० रुपये किलो, कोथिंबीर १६०, टोमॅटो १२० आणि हिरव्या मिरचीचे भाव १५० रुपयांवर पोहोचले आहेत. यासह अन्य भाज्यांचे दर ६० ते ८० रुपयांदरम्यान आहेत. ५०० रुपयांच्या भाज्यांसाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.
कॉटन मार्केट असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, एक महिन्याआधी आलेल्या पावसामुळे अद्रक आणि लसणाचे भाव वाढले आहेत. १५ दिवसांआधी किरकोळमध्ये कोथिंबीर १०० रुपये, टोमॅटोचे भाव ६० रुपये होते. पावसामुळे वाहतूक थांबली आहे. आवक फारच कमी असल्याने भाव तेजीत आहेत. दरवाढीमुळे गृहिणींनी काही भाज्यांकडे पाठ फिरविली आहे. उपबाजार कॉटन मार्केटमध्ये नागपूर जिल्ह्याच्या काही भागातून आवक सुरू आहे.
सोमवारी क्वार्टर बाजारातील विक्रेते म्हणाले, शेंगा, वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक, चवळी भाजीचे भाव आवाक्यात आहेत. अन्य भाज्यांच्या किमती प्रचंड वाढल्याने लोकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. याशिवाय गुंतवणूक वाढल्यामुळे या व्यवसायात जोखीम वाढली आहे. भाज्या विक्रीची चिंता नेहमीच असते. अनेकदा तोटा होतो. टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची विक्री कमी झाली आहे.
टोमॅटोची बेंगळुरू येथून आवक
नागपूर शहराला केवळ मदनपल्ली (बेंगळुरू) येथून टोमॅटोचा पुरवठा होत आहे. संगमनेर, नाशिक, छिंदवाडा, बुलढाणा, औरंगाबाद येथून होणारी आवक सध्या बंद आहे. पावसामुळे अनेक भागातून वाहतूक थांबली आहे. या सर्व बाबींचा परिणाम दरवाढीवर झाली आहे. चार दिवसातच ६० रुपयांचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत.
कोथिंबीरची आवक घटली
कोथिंबीरची सर्वाधिक आवक मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून होते. या भागातही पावसामुळे शेतीचे नुकसान केले असल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.