नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 07:42 PM2020-01-02T19:42:00+5:302020-01-02T19:53:44+5:30

हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

Pink cold became immunization in Nagpur | नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

Next
ठळक मुद्देथंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणामसर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: बालकांना सर्दी, खोकला, ताप, दमा, न्यूमोनिया, मोठ्यांमध्ये वाढलेला संधिवाताचा त्रास तर ज्येष्ठांमध्ये कंबरदुखी, मणक्यांचे आजार बळावले आहेत.
हिवाळा हा अनेकांसाठी सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू. सुट्या साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबिक सहलीपर्यंत कितीतरी कारणांनी या ऋतूचा आनंद लुटला जातो. मात्र सध्या प्रमाणाबाहेर घसरलेला पारा, ढगाळ वातावरण त्यात पावसाची पडलेली भर यामुळे विविध आजाराची डोकेदुखी वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या लहान मुले सर्दी, खोकल्याने बेजार झाली आहेत.

५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनियाचे
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी.एम. बोकडे म्हणाले, बदललेल्या वातावरणाचा शरीरावर लवकर प्रभाव पडतो. विशेषत: लहान मुले याला लवकर बळी पडतात. परिणामी, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनियाचे येत आहेत. यातील १० ते १२ टक्के रुग्णांना वॉर्डात भरती करून उपचार द्यावे लागत आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठी थंडीपासून बचाव करावा. कुठल्याही थंड वस्तूचे सेवन करू नये. शिळे अन्न खाऊ नये. नवजात बालकांना उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे, वारंवार स्तनपान करावे.

संधिवाताचा दाह वाढलेल्या रुग्णांत वाढ
ऑर्थरायटिस डॉ. श्रुती रामटेके म्हणाल्या, थंडी वाढल्यास संधिवात म्हणजे ऑर्थरायटिसचे रुग्ण वाढतात, असे नाही. या दिवसांमध्ये स्नायू जाड होतात, यामुळे संधिवाताचा दाह वाढतो. सध्या असलेल्या हवामानामुळे ‘ह्युमटॉईड ऑर्थरायटिस’ व ‘ऑस्टिओ ऑर्थरायटिस’चा त्रास वाढलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित औषधे व नियमित व्यायाम करायला हवा.

२० टक्क्याने वाढले श्वसनाचे रुग्ण
श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, थंडीत दमा, सीओपीडी व श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होते. परंतु सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्याने या सर्वच आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला असून, त्यांना डोज वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय आहे.

 

Web Title: Pink cold became immunization in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.