आमदाराच्या सुरक्षा रक्षकाचे पिस्तूल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:59 PM2018-12-03T22:59:16+5:302018-12-03T23:00:20+5:30
आंध्र प्रदेशातील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे ९ एम.एम.ची आणि १० राऊंड असलेली पिस्तूल संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोमवारी चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंध्र प्रदेशातील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचे ९ एम.एम.ची आणि १० राऊंड असलेली पिस्तूल संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोमवारी चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ताल्लुर मोहनराव शिवरामय्या (४३) रा. नेल्लोर, आंध्र प्रदेश असे फिर्यादी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर आंध्र प्रदेशमधील आमदार बी.व्ही. रामाराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार बी. व्ही. रामाराव हे १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसने ओंगल ते नागपूर असा प्रवास करीत होते. ए-१ कोचमध्ये त्यांचा ३४ क्रमांकाचा बर्थ होता. यावेळी सुरक्षा रक्षक ताल्लुर त्यांच्यासोबत होता. त्याच्याकडे ९ एमएमचे १० राऊंड असलेले पिस्तूल होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी आ. रामाराव यांचे लक्ष सुरक्षा रक्षकाच्या कंबरेकडे गेले, त्यावेळी पिस्तूल त्यांना दिसले नाही. त्यांनी त्याला पिस्तूलबाबत विचारल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने कोचमध्ये पिस्तूलचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळले नाही. सकाळच्या सुमारास वरोरा ते हिंगणघाट रेल्वेस्थानकादरम्यान कंबरेचा पट्टा सैल झाल्याने पिस्तूल पडून कुणीतरी ते घेऊन गेले असावे, असा संशय आहे. मात्र, पिस्तूलमध्ये १० राऊंड असल्याने त्याचा दुरुपयोग होण्याचीही भीती आहे. सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच याची सूचना लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक रवी वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी कोचमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाचे बयान नोंदविले. फिर्यादी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द पिस्तूल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.