पतंग उडविणाऱ्यांवर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 10:35 PM2021-01-13T22:35:56+5:302021-01-13T22:37:42+5:30
nylon manja action नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झालेले असून, शहरातील तीन जणांचा मृत्यूही झालेला आहे. यामुळे मनपाने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यासह नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यांवर मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलीस प्रशासनाद्वारे बुधवारी संयुक्त कारवाई करून काही तरुणांना तब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मकरसंक्रांतीच्या पर्वावर नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येत आहेत. मात्र पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झालेले असून, शहरातील तीन जणांचा मृत्यूही झालेला आहे. यामुळे मनपाने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यासह नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यांवर मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलीस प्रशासनाद्वारे बुधवारी संयुक्त कारवाई करून काही तरुणांना तब्यात घेतले.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करण्यासाठी उपद्रव शोध पथकाचे ८१ कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थाही मनपाला सहकार्य करीत आहेत. मात्र शहरातील लोकसंख्येचा विचार करता ही संख्या तोकडी आहे. त्यामुळे लोकसहभाग व जनजागृती होणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
आतापर्यंत सुमारे १७८ नायलॉन मांजा चक्री जप्त करून, जवळपास ६३ हजार रुपयापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीनेही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. याबाबत कारवाईसाठी मनपाचे पोलीस प्रशासनासोबत प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून मनपाला सहकार्य करावे. कुठेही नायलॉन मांजाची विक्री आढळल्यास किंवा त्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास त्वरित त्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयात किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
५०४ दुकानांची तपासणी
उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी २,४०० रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच २,७८० पतंगसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाने १६७ चक्री जप्त केल्या आणि ५०४ दुकानांची तपासणी केली. तरुणांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधकृष्णन बी. यांनी केले आहे.