पीडित महिला-मुलींना पोलिसांचा भरोसा
By admin | Published: January 2, 2017 02:39 AM2017-01-02T02:39:20+5:302017-01-02T02:39:20+5:30
हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी ‘भरोसा सेल’मधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे.
महाराष्ट्रातील पहिला उपक्रम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : राज्यात सर्वत्र सुरू करणार ‘भरोसा सेल’
नागपूर : हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी ‘भरोसा सेल’मधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही ‘भरोसा सेल’ची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
हैदराबादच्या धर्तीवर शहर पोलिसांनी राज्यातील पहिलेवहिले ‘भरोसा सेल’ नागपुरातील सुभाषनगर टी-पॉर्इंटजवळ सुरू केले. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनुप कुमार, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त पाटणकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रंजन कुमार शर्मा तसेच अनेक गणमान्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानामुळे हिंसेचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या बळावरच आम्ही पीडितांना न्याय देऊन गुन्हेगारी नियंत्रित करू शकतो. त्यातून कायद्याचा धाक निर्माण करू शकतो. पोलीस जनतेच्या मदतीकरिता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगतानाच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताना येथे आपल्याला न्याय मिळेल, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होण्याची गरजही त्यांनी विशद केली.
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडणारच नाही, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. भरोसा सेलच्या निर्मितीमागे हाच उद्देश आहे. नागपूर आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयामार्फत अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. सीसीटीएनएस, डिजिटल ठाणी, सीसीटीव्ही यासारखे उपक्रम पथदर्शी आहते. प्रशासनाच्या वतीने नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करताना उच्च तंत्रज्ञानावर भर देण्यात येईल. पोलिसांच्या निवास व्यवस्थेबाबतही शासन अनुकूल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कायद्याचा आदर आणि धाक असणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोणत्याही तक्रारीवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडवून आणण्यावर भर द्यावा.
आधी समेट आणि नंतर कायदा हे धोरण पोलिसांनी ठेवावे, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
२४ बाय ७ सेवा
अनेक प्रकरणांत पीडित महिलांना कुठे न्याय मागावा, हेच समजत नाही. न्यायासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते. घरगुती हिंसाचार आणि हुंडाविरोधी प्रकरणात अनेकदा पीडितेचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसार विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे भरोसा सेलमध्ये समुदेशन करण्यात येईल. त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येईल. भरोसा सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल. २४ तासात तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरू राहील. रात्री-बेरात्री कुणी पीडित महिला-मुलगी आल्यास आणि गरज भासल्याच तिच्या राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात येईल, अशी ग्वाही भरोसा सेलची संकल्पना स्पष्ट करताना पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी नोंदवून घेतली
पहिली तक्रार
भरोसा सेलच्या माध्यमातून महिला अत्याचार रोखण्यासाठी १०९१ क्रमांकाची हेल्पलाईन आहे. १०० क्रमांकावर फोनवरून तक्रारी स्वीकारून संबंधितांकडे पाठविण्यात येईल. पीडित महिलेच्या तक्रारीचे वर्गीकरण करून त्यांना ज्या प्रकारची सेवा आवश्यक आहे, ती उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष म्हणजे, आज उद्घाटनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्ता नामक महिलेची पहिली तक्रार स्वत: नोंदवून घेतली.