नागपूर : नागपूर महापालिकेची बाबुळबन इंग्लिश मीडियम ही शाळा आकांक्षा फाऊंडेशनतर्फे संचालित करण्यात येत आहे. या शाळेत २०२३-२४ या सत्रासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली होती. २५० पालकांनी त्यासाठी अर्ज केले होते. ३० जून रोजी शहरातील सर्व शाळा सुरू झाल्या पण मनपाच्या बाबुळबन शाळेत प्रवेश देण्यात आले नाही. त्यामुळे पालकांनी मनपाचे शिक्षणाधिकारी, महापालिका आयुक्त व आकांक्षा फाऊंडेशनचे संचालक यांच्या विरोधात लकडगंज पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत पालकांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात टाकले व पालकांची फसवणूक केली. तक्रारीत उल्लेख आहे की आकाक्षा फाऊंडेशनतर्फे एप्रिल महिन्यात या शाळेसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू केली होती. पालकांनी रांगेत लागून टोकन घेतले. २५० विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात आले. मे महिन्यात लॉटरी निघणार होती. यात २० मुले आणि २० मूलींना ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश मिळणार होता.
मे, जून महिन्यात लॉटरी निघाली नाही. शाळा ३० जूनला सुरू झाल्यानंतरही प्रवेश देण्यात आले नाही. यासंदर्भात पालकांनी महापालिका प्रशासनाला विचारले असता मनपा खोल्या बांधण्याचे काम करीत आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे फाऊंडेशनचे संचालक सांगतात. वर्गखोल्या नव्हत्या तर प्रवेश प्रकीया का राबविली? असा सवाल पालकांनी प्रशासनाला केला आहे. पालक पूजा नाईक, प्रकाश सोनटक्के, संजय सावरकर, रुपेश कारेमोरे, प्रिती कुहीकर, मोनाली बालपांडे, सरस्वती बसेना आदींनी ही तक्रार केली आहे.