गस्तीवरील पोलीस बनले देवदूत : वाचविले बुडणाऱ्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:12 AM2019-07-17T00:12:24+5:302019-07-17T00:14:04+5:30
पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे.
गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक दोनमधील पोलीस अधिकारी-कर्मचारी मंगळवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत होते. फुटाळा तलावावरील एकाने आरडाओरड करून पोलिसांचे लक्ष वेधले. तलावात एका तरुणाने उडी घेतल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, हवालदार प्रकाश वानखेडे, विजय लेकुरवाळे आणि नायक बलजितसिंग यांनी लगेच वाहनातून उतरून टॉर्चने तलावात बघितले असता एक तरुण पाण्यावर जीव वाचविण्यासाठी हातपाय मारत असल्याचे त्यांना दिसले. पहाटेची वेळ असल्याने आणि तरुण तलावाच्या काठावरील भिंतीनजीकच असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे आरोपींना बांधण्यासाठी वापरण्यात येणारा दोर फेकला. दोर जास्त लांब नसल्याने तरुणापर्यंत जात नव्हता. त्यामुळे बंदोबस्ताच्या वेळी वापरण्यात येणाºया कठड्याची बल्ली काढून त्याला दोर बांधून तरुणाकडे फेकला आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला धीर दिल्यानंतर त्याची विचारपूस करण्यात आली. त्याने आपले नाव सौरव प्रकाश गुलालगिरी (वय १९) असे सांगितले. तो आपल्या मामाकडे महावीरनगरात राहतो. महत्त्वाच्या कामासाठी दिलेली रक्कम भलत्याच ठिकाणी कामी लावल्यामुळे त्याची कोंडी झाली. त्यामुळे सौरवने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात उडी घेतल्यानंतर त्याला जीवाचे मोल कळले. त्यामुळे त्याने आरडाओरड केली. सुदैवाने एक व्यक्ती तेथून जात असल्याने त्याच्या ते लक्षात आले. त्यामुळे त्याने उपरोक्त पोलिसांचे वाहन थांबवून त्यांना तलावात एकाने उडी घेतल्याची माहिती दिली आणि पोलिसांनी तत्परता दाखवून सौरवचे प्राण वाचविले. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देऊन अंबाझरी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.
पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा
कम्युनिटी पुलिसिंगची संकल्पना राबविणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना ही माहिती कळताच त्यांनी सौरवचा जीव वाचविणाऱ्या पोलिसांची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, सौरव गुलालगिरीला तलावाबाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपूरकरांनीही उपरोक्त पोलिसांचे कौतुक केले.