पोलिटीकल दांडिया !
By admin | Published: September 27, 2014 02:36 AM2014-09-27T02:36:45+5:302014-09-27T02:36:45+5:30
घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती व आघाडीत काडीमोड झाल्यानंतर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये दिवसभर ‘पोलिटिकल दांडिया’ खेळल्या गेला.
नागपूर : घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती व आघाडीत काडीमोड झाल्यानंतर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये दिवसभर ‘पोलिटिकल दांडिया’ खेळल्या गेला. उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांचा कस लागला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर बैठकांचे सत्र आटोपत भाजपचे एकएक उमेदवार निश्चित झाले. हिंगण्यात समीर मेघे तर सावनेरमध्ये सोनबा मुसळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दक्षिण नागपूर, रामटेक, काटोलसाठी रस्सीखेच सुरू राहिली. तर, काँग्रेसचे माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्या बंगल्यावर ग्रामीणचे उमेदवार ठरले. मध्यरात्रीनंतर कामठीतून राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
काँग्रेसने हिंगणा मतदारसंघासाठी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कुंदा राऊत, काटोलमध्ये दिनेश ठाकरे व उमरेडमध्ये संजय मेश्राम यांचे नाव निश्चित केले. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार दीनानाथ पडोळे यांना ‘आॅफर’ देत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मतदारसंघांत ‘आॅपरेशन सर्च’राबविले. केंद्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल दिवसभर नागपुरात तळ ठोकून होते. दक्षिणमध्ये किरण पांडव याची उमेदवारी जाहीर झाली असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी एबी फॉर्म मिळाला तर लढण्याची इच्छा व्यक्त करीत धनुष्य ताणला. शिवसेनेतर्फेही भाजपच्या असंतुष्टांना खेचण्याचे प्रयत्न झाले. बसपाने आठ उमेदवारांची तर मनसेनेही सहा उमेदवारांची घोषणा केली. भाजपने दुपारी अर्ज भरणाऱ्या आमदारांची नावे रात्री रीतसर जाहीर केली तर राष्ट्रवादीनेही अनिल देशमुख (काटोल) व रमेश बंग (हिंगणा) या दुपारी अर्ज भरलेल्या नेत्यांची नावे रात्री जाहीर केली.