लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाचा विचार केला तर नागपूर शहर हे प्रदूषण यादीत असले तरी इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नियंत्रित राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर या स्थितीत अत्यंत समाधानकारक सुधारणा झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपविल्यानंतर काय, हा चिंतनाचा विषय आहे. प्रदूषणाची स्थिती कायम नियंत्रणात ठेवायची असेल तर लॉकडाऊनसारख्या नियमांचे पालन नेहमी करावे लागेल. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नागपूरचा विचार केल्यास कार्बन, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडायआॅक्साईड, नायट्रोक्साईड आदी प्रदूषण मानकांचे प्रमाण कायम धोक्याच्या पातळीच्या खाली राहिले आहे. मात्र खरी चिंता पर्टिक्युलेट मॅटर(धूलिकण)ची आहे. धोक्याची पातळी ८० मायक्रोग्रॅम असताना टाळेबंदीपूर्वी ती १२० मायक्रोग्रॅमच्यावर पोहचली होती. मोठ्या प्रमाणात चालणारे बांधकाम, मानवी हालचाल, वाहनांची वाढ आणि वीज प्रकल्प ही यामागची कारणे तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जातात. टाळेबंदीच्या काळात धुलिकणांचे प्रमाण ४० ते ५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली घसरले. वायू गुणवता ४८ ते ५९ वर स्थिर राहिली आहे, ही अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल. डॉ. देशपांडे यांच्या मते, टाळेबंदीच्या दोन-तीन दिवसातच परिस्थिती बदलली होती. टाळेबंदीनंतर मानवी हालचाली वाढल्यास कदाचित एवढ्याच दिवसात प्रदूषण पूर्वस्थितीत येईल. हेच आपणाला टाळायचे आहे.यासाठीच मंडळातर्फे ‘एअर अॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. नियम आधीच बनलेले आहेत, गरज आहे ती केवळ कठोर अंमलबजावणीची. कचरा फेकणे, जाळणे याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरेल. गरज नसेल तिथे गाड्यांचा वापर टाळावा. उद्योग आणि बांधकामे सुरू होतीलच, मात्र नियमांच्या बाबतीत मनपाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यात पोलीस, आरटीओ, अभियांत्रिकी कॉलेज, नीरी, एनएमआरडीए, जिल्हा पुरवठा अधिकारी, स्मार्ट सिटी अशा सर्वसमावेशक कृतीनेच आपण प्रदूषणावर नियंत्रण आणि आपले नागपूर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवू शकतो, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.‘नीरी’चीही तयारीनीरीच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. के. व्ही. जॉर्ज यांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना केवळ ऊर्जा प्रकल्प सुरू होते आणि तरीही प्रदूषण खाली आले आहे. यावरून ऊर्जा प्रकल्प प्रदूषणास अधिक कारणीभूत नाहीत. त्यामुळे आपल्याला बांधकामे आणि वाहने या प्रदूषणावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही अभ्यास करीत आहोत आणि त्यानुसार योजना तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली, पण याच स्थितीत आपण राहू शकत नाही. लॉकडाऊन हटवावे लागेल आणि इतर अॅक्टिव्हिटी पूर्वीप्रमाणे सुरू होतील. अशावेळी प्रदूषण नियंत्रित करणे नागरिकांची व सर्वांची जबाबदारी असेल. लॉकडाऊनसारख्याच नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल. आता नागरिकांनीही त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.- डॉ हेमा देशपांडे, संचालिका, एमपीसीबी, नागपूर
‘एअर अॅक्शन प्लॅन’द्वारे प्रदूषण नियंत्रण : प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला मनपाला ‘प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:29 PM
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
ठळक मुद्देकठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी हवी