लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तामसवाडी फाटा ते हिंगणा बारभाई हा रस्ता पूर्णत: उखडला असून, जागाेजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांची आहे.
तामसवाडी फाटा ते हिंगणा बाराभाई हे अंतर ४ किमी आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्षच करण्यात आले. सध्या हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली असल्याने समाेरील रस्ता दिसत नाही. यामुळे अनेकदा किरकाेळ अपघातही घडतात.
हाच मार्ग पुढे डोरली, वाघोडा, गरंडा, गवना, पालोरा गावांना जाेडला जाताे. शिवाय या मार्गाने पारशिवनीचे अंतर कमी हाेते व वेळेची बचत हाेते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थीदेखील याच मार्गाने प्रवास करतात. तसेच या मार्गावरील गावात विटभट्ट्या असल्याने जड वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असल्यामुळे रहदारीला माेठा अडसर ठरत आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा केली. परंतु अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही. गावकऱ्यांची गैरसाेय लक्षात घेता या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी कृउबासचे सभापती अशोक चिखले यांच्यासह नागरिकांनी केली आहे.