पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:36 AM2020-06-08T11:36:16+5:302020-06-08T11:36:47+5:30
कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्तास नागपुरात हा निर्णय लागू होणार नसल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांंना घरी विलगीकरणात ठेवण्याच्या शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. परंतु नागपुरात कोविडची स्थिती व मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असल्याने तूर्तास नागपुरात हा निर्णय लागू होणार नसल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार, लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत केले जाते. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते.
परंतु आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा (होम आयसोलेशन) पर्याय उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाच्या सूचना आहेत. यासाठी संबंधित डॉक्टरला रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे. होम आयसोलेशनमध्ये योग्य सोईसुविधा उपलब्ध असायला हव्यात, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असायला असावी, घरी काळजी घेणाऱ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा देण्यात यावी.
अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन करण्याचा शासनाच्या नव्या सूचना आहेत. परंतु नागपुरात सध्याच्या स्थितीत रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा पाहता यावर पुढे निर्णय घेता येईल. तूर्तास पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर रुग्णालयातच उपचार होतील.
-रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी