गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : काँग्रेसने सत्तेत असताना पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केल. त्याचाच परिणाम आज भोगावा लागतोय. पक्षसंघटन मजबूत व्हावे यासाठी काँग्रेस सेवादलाची स्थापना झाली. त्याचीच कॉपी आरएसएसने केली. मात्र काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़
बदललेल्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते?नीतीभ्रष्ट राजकारण सुरू आहे. राजकारणामुळे गरिबांचे प्रश्न सुटत असतील तर स्तर चांगला, अन्यथा खालावलेला समजावा, या मताचा मी आहे. मुळात राजकीय मंडळींचा स्तर खाली आला, म्हणून राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसत आहे. सध्या निवडणुकांच्या तोंडावर कारवाया होताना दिसत आहेत. एवढी वर्षे का झोपले होतात ? राजकारण द्वेषाचे नसावे. सत्ता सर्वकाळ नसते, हे समजून घ्यावे.
पक्षांतराबद्दल काय वाटते ?पक्ष सोडून जाणारे निष्ठावंत कधीच नव्हते, तर स्वार्थात रमलेले होते. जाणारे जर पिढीजात असतील तर पक्षाचा मूळ विचार कुठे गेला? याचाच अर्थ ते संधिसाधू होते.
सध्याच्या कामगार धोरणांबद्दल काय वाटते ?धोरण वाईट नाही, पण कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी उद्योजकांच्या फायद्यावर चर्चा होणे वाईट आहे. संघटित आणि असंघटित अशा दोन वर्गात कामगार विभागला आहे. असंघटित कामगारांच्या हितरक्षणासाठी सरकारने संरक्षण देण्याची गरज आहे. आवश्यक तिथे नवे कायदेही व्हावे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला हरताळ का फासला जातोय ?सत्तेची मेनका भल्याभल्यांंना आकर्षित करते. विदर्भाचे आंदोलन करणारे नेते राजकारणाला बळी पडले. चळवळ खिळखिळी झाली, हा इतिहास आहे. त्यामुळे विदर्भाच्या मागणीवरून आणि आंदोलनावरून जनतेचा विश्वास उडाला. भाजपाने जाहीरनाम्यात विदर्भ राज्यनिर्मितीचे आश्वासन दिले होते. आता त्याचे उत्तर मागण्यासाठी जोर हवा. कोणतेही आंदोलन लोकशक्तीवर असते. उद्दिष्टासाठी त्यागाची गरज असते.
विदर्भाच्या औद्योगिक सक्षमतेसाठी काय हवे ?विदर्भातील बेकारीचा विचार करून रोजगारप्रधान उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. आधुनिकीकरण आणि तांत्रिक सक्षमतेतून विकास होईल, पण बेकारी दूर होणार नाही. हा विकास मर्यादित असेल. असे विकासाचे धोरण चुकीचे आहे. मिहानकडून विदर्भाला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याची अपेक्षेप्रमाणे प्रगती व्हायला हवी़