‘निर्धार’मधून भविष्याच्या ‘व्हिजन’वर प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:25 AM2017-09-24T01:25:04+5:302017-09-24T01:25:19+5:30
भविष्यात नेमके कुठल्या दिशेने मार्गक्रमण करावे, यासंदर्भात विद्यार्थीदशेत मार्गदर्शन मिळाले तर यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी आणखी उत्साह निर्माण होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भविष्यात नेमके कुठल्या दिशेने मार्गक्रमण करावे, यासंदर्भात विद्यार्थीदशेत मार्गदर्शन मिळाले तर यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी आणखी उत्साह निर्माण होतो. नागपुरातील शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांना याची अनुभूती आली. विज्ञान संस्थेत ‘निर्धार : ध्यास ध्येयप्राप्तीचा’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्याची तयारी यावर आधारित ही कार्यशाळा होती.
ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर तसेच संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी डॉ. रिता अग्रवाल, डॉ. संजय रघटाटे, डॉ. सुरेंद्र गोळे तसेच डॉ. सुमंत टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मनोबल खचू न देता आत्मविश्वास वाढविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन डॉ.अग्रवाल यांनी केले. योग्यता, वृत्ती व संधी यांचा योग्य उपयोग करुन कुठलेही ध्येय प्राप्त करता येते, असे मत डॉ.गोळे यांनी व्यक्त केले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली कसे होईल, यासाठी विद्यार्थीदशेपासूनच प्रयत्न करा, असा संदेश डॉ.रघटाटे यांनी दिला. शिवाजी महाराजांवर भाष्य करणारे डॉ.सुमंत टेकाडे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा दिली.
कार्यशाळेचा दुसरा दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मौलिक ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक सचिन बुरघाटे यांनी इंग्रजी भाषेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या ‘टीप्स’ दिल्या. आयुष्यात आशेला महत्त्वाचे स्थान असते. ‘होप’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक शब्दांत मार्गदर्शन केले. शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेचे सहप्राचार्य सुभाशिष चंद्रा यांनी विज्ञान शाखेतील करिअर संधींवर प्रकाश टाकला. स्वायमा अहमद यांनी ‘सॉफ्ट स्किल्स’ आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले. धीरज सिंह, कार्तिक पाठक, श्रेयस रामोजवार, श्रद्धा रायकवार, तृप्ती भोंगाडे, श्रीकांत काटोरे, पलक बहेल, अंजली साहू, राहुल बेंद्रे, अनुज डोये यांचे कार्यशाळा आयोजनात सहकार्य लाभले.