संघस्थानी येणारे प्रणव मुखर्जी ठरणार पहिले माजी राष्ट्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:58 PM2018-05-28T22:58:27+5:302018-05-28T22:58:38+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संघातर्फेच याला दुजोरा देण्यात आला असून या कार्यक्रमाच्या पत्रिकादेखील वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावरून उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष निश्चितच या वर्गाकडे राहणार आहे. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर यासंबंधातील वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संघातर्फेच याला दुजोरा देण्यात आला असून या कार्यक्रमाच्या पत्रिकादेखील वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावरून उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष निश्चितच या वर्गाकडे राहणार आहे. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर यासंबंधातील वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुखर्जी यांनीदेखील येण्यासाठी होकार कळविला होता. मात्र संघाने याबाबतीत ‘दक्ष’ पवित्रा घेतला होता. पत्रिका येईपर्यंत संघ पदाधिकाऱ्यांनीदेखील मौन साधले होते. मात्र सोमवारी संघाकडून अनेक स्वयंसेवकांना पत्रिका पाठविण्यात आल्या व त्यात प्रणव मुखर्जी यांचे नाव ठळकपणे छापण्यात आले आहे.
सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करणे ही परंपराच
प्रणव मुखर्जी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या मुशीतूनच झाली आहे. संघ परिवार आणि भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर प्रहार करण्यात येत आहे. अशा स्थितीत प्रणव मुखर्जी यांना संघस्थानी का आमंत्रित करण्यात आले हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला विचारणा केली असता सन्माननीय व्यक्तींना संघाच्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करणे ही परंपराच असल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुळात संघाला धर्म, पंथ, पक्ष यांचे बंधन नाही. प्रणव मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती होते व त्यांना आदरानेच आमंत्रित करण्यात आले आहे. यात राजकारण असण्याचा काहीच प्रश्न नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.