ठळक मुद्देतृतीय वर्ष वर्गाचा समारोपदेशाचे लक्ष रेशीमबागकडेसरसंघचालकांसमवेत भोजनदेखील करणार
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप होणार असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन करणार, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील यावेळी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, कार्यक्रमानंतर स्मृतिमंदिरातच प्रणव मुखर्जी हे सरसंघचालक व संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत भोजनदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रेशीमबाग मैदानावर सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात १४ मेपासून संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात झाली. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या शिक्षार्थ्यांना प्रणव मुखर्जी व डॉ.मोहन भागवत हे गुरुवारी मार्गदर्शन करतील. कॉंग्रेससह विरोधी पक्षातील विविध नेत्यांकडून मुखर्जी यांच्या संघाच्या निमंत्रणाच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र विरोधानंतरदेखील प्रणव मुखर्जी आपल्या निर्णयावर ठाम होते व नागपुरात ते नेमके काय भाष्य करतील, याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.सहसरकार्यवाहांनी केले मुखर्जींचे स्वागतया कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रणव मुखर्जी यांचे बुधवारी सायंकाळी ५ वाजताच नागपुरात आगमन झाले. एरवी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी अतिथींच्या स्वागताला जात नाहीत. मात्र संघाचे सहसरकार्यवाह व्ही. भागय्या यांनी स्वत: त्यांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले. यावेळी संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत सहकार्यवाह अतुल मोघे, सुभाष कोटेचा हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच प्रशासनातून विभागीय आयुक्त अनुप कुमार हेदेखील होते. यानंतर प्रणव मुखर्जी हे थेट राजभवनाकडे रवाना झाले.कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांची पाठदरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेसचे नेतेदेखील येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेतृत्व राहिलेले तसेच राष्ट्रपतिपद भूषविलेल्या मुखर्जी यांच्या स्वागताला एकही कॉंग्रेस नेता किंवा पदाधिकारी फिरकला नाही. त्यांच्या नागपूर आगमनाकडे कॉंग्रेसने पाठच फिरविल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.बोस व शास्त्री यांचे वंशजदेखील पोहोचलेदरम्यान, कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदु बोस, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री यांचेदेखील बुधवारी नागपुरात आगमन झाले. याशिवाय अरविंद मिल्सचे संजय लालभाई, मफतलाल इंडस्ट्रीजचे विशाल मफतलाल, ‘सीसीएल प्रोडक्ट्स’ छल्ला राजेंद्र प्रसाद, माजी भारतीय फुटबॉलपटू कल्याण चौबे, सुप्रसिद्ध लेखक आणि ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’चे संस्थापक राजीव मल्होत्रा हेदेखील कार्यक्रमात राहणार असून तेदेखील बुधवारी शहरात पोहोचले. संघाच्या पदाधिकाºयांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले....तर सुरेश भट सभागृहात कार्यक्रमदरम्यान, नागपुरात सध्या मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण असून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. रेशीमबाग मैदानात अतिथींसाठी ‘वॉटरप्रूफ’ मंच उभारण्यात आला आहे. मात्र जर ऐनवेळी पावसाचा जोर वाढला तर सुरेश भट सभागृहात कार्यक्रम होईल, अशी माहिती संघातील सूत्रांनी दिली. कार्यक्रमाला नागपूर व विदर्भातील गणमान्य व्यक्तींनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. संघाच्या संकेतस्थळावरुन तसेच फेसबुक पेजवरुन हा कार्यक्रम ‘लाईव्ह’ होणार आहे.