तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश नागपूर : जिल्ह्यातील अपंगांची यादी तयार करून प्रत्येक व्यक्तीला अपंगांसाठींच्या शासनाच्या योजनांची माहिती कळवा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या महसुली उत्पन्नातून तीन टक्के निधी अपंगांसाठींच्या योजनांसाठी राखीव ठेवून त्यातून कोणत्या योजना राबवणार आहेत याची माहिती आठ दिवसात मागवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा अपंग पुनर्वसन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. अपंग कल्याणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित झाली असून तालुकास्तरीय समिती गठित व्हायची आहे. अपंगांना साहित्य वाटपासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती गठित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या वाटपाचा निधी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे जमा करावा. पण निधी जमा करण्याचा उल्लेख शासन परिपत्रकात नाही, याकडेही याप्रसंगी लक्ष वेधण्यात आले. या निधीचे नियोजन जिल्हाधिकारी करतील व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र योजना अंतिम करतील आणि या योजनांना पालकमंत्री अंतिम मंजुरी देतील. मनपा, जिल्हा परिषद, नगर परिषदा यांनी आपल्या महसुली उत्पन्नातून तीन टक्के निधी राखीव ठेवावा. स्थानिक स्वराज्य संस्था व नगर पंचायतींना पत्र पाठवून त्यांच्यामार्फत अपंगांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मागवा. या योजनांच्या अंमलबजावणीची देखभाल व नियंत्रण जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने ठेवावे. ज्या योजना या संस्था राबवणार आहेत, त्या योजनांची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद सीईओ डॉ. कांदबरी बलकवडे, अपंग पुनर्वसन केंद्राचे अधिकारी, जिल्हा समितीचे सदस्य आशिष मोरे व अन्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)
योजनांसाठी अपंगांची यादी तयार करा
By admin | Published: July 31, 2016 2:41 AM