‘डिमांड’ असलेल्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 AM2021-01-13T04:16:22+5:302021-01-13T04:16:22+5:30
नागपूर : कोरोनाच्या काळात नियमित रेल्वेगाड्या बंद आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येत आहेत. परंतु ज्या गाड्यांना ...
नागपूर : कोरोनाच्या काळात नियमित रेल्वेगाड्या बंद आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येत आहेत. परंतु ज्या गाड्यांना प्रवाशांची अधिक मागणी होती अशा गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे बोर्डाने केली असून, याबाबत नुकतेच मुंबई झोनला पत्र पाठविण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाच्या पत्रामुळे लवकरच नागपूरवरून मुंबई आणि पुण्यासाठी धावणाऱ्या १२१३९/१२१४० सेवाग्राम एक्स्प्रेस आणि त्रि साप्ताहिक १२१३५/१२१३६ पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेसला स्पेशल रेल्वेगाडी म्हणून चालविण्याची तयारी करण्यात येत आहे. तर साप्ताहिक रेल्वेगाडी २२१३७/२२१३८ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेसला वीकली स्पेशल म्हणून चालविण्यात येणार असल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई झोनला या रेल्वेगाड्यांसाठी रॅक तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्याच या रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत तारीख ठरविण्यात आलेली नाही. चीफ पॅसेंजर ट्रेडिंग मॅनेजर डी. वाय. नाईक यांनी प्रिंसिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर यांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे की, झोनअंतर्गत १७ जोडी रेल्वेगाड्या स्पेशल म्हणून चालविण्याची तयारी आहे. अशास्थितीत २२ रॅकची गरज भासणार आहे. यातील १७ रॅक आयसीएफ आणि ७ एलएचबी कोचेसच्या राहणार आहेत. आदेशात म्हटले आहे की, सध्या १६९ रॅकपैकी ९९ रॅक मेल आणि एक्स्प्रेसमध्ये स्पेशल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून उपयोगात आणल्या जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे आदेशात उल्लेख केलेल्या १७ जोडी रेल्वेगाड्या रुळावर आणण्याची तयारी १ एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत प्रवाशांच्या असलेल्या मागणीनुसार करण्यात आली आहे. नागपूरवरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यात या कालावधीत १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १३०.८५ टक्के, रेल्वेगाडी क्रमांक १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १२९.५ टक्के, रेल्वेगाडी क्रमांक १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेसमध्ये ११८.९२ टक्के आणि १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये ११२.९२ टक्के तर रेल्वेगाडी क्रमांक २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये १३२.३६ टक्के तिकिटांची मागणी राहात होती. त्यामुळे या गाड्या सुरू करण्याचा विचार रेल्वे बोर्डाने केला आहे.
.................