राष्ट्रपती हेलिकॉप्टरपेक्षा रस्त्याने १० मिनिटांपूर्वीच पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:09 AM2017-09-24T01:09:00+5:302017-09-24T01:09:19+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा यशस्वी झाला. विशेष म्हणजे सुरुवातीला ते हेलिकॉप्टरने हा दौरा करणार होते. परंतु काही कारणास्तव हेलिकॉप्टरचा दौरा रद्द करून रस्ता मार्गानेच हा दौरा करावा लागला.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा यशस्वी झाला. विशेष म्हणजे सुरुवातीला ते हेलिकॉप्टरने हा दौरा करणार होते. परंतु काही कारणास्तव हेलिकॉप्टरचा दौरा रद्द करून रस्ता मार्गानेच हा दौरा करावा लागला. विमानतळ ते दीक्षाभूमी, दीक्षाभूमी ते रामटेक, रामटेक ते कामठी ड्रॅगन पॅलेस आणि कामठी ते परत राजभवन असा त्यांचा पहिल्या टप्प्यातील दौरा होता. हेलिकॉप्टरच्या नियोजित दौºयानुसार ते दीक्षाभूमी रामटेक व कामठीतील कार्यक्रम आटोपून राजभवनावर २.२० वाजता परत येणार होते. हा संपूर्ण दौरा रस्त्याने केल्यानंतरही ते बरोबर २.१० वाजता म्हणजे १० मिनिटांपूर्वीच राजभवनावर पोहोचले, हे विशेष. राष्ट्रपतींचा हा दौरा ठरलेल्या वेळेतच यशस्वीपणे पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची मोठी भूमिका राहिली आहे. अधिकाºयांनी सर्व यंत्रणा व आयोजक व पाहुण्यांशी समन्वय साधून ‘सेकंद टू सेकंद’चे योग्य नियोजन आखल्यानेच हा दौरा यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे २२ तारखेला नागपूरला येणार हे निश्चित झाले तेव्हापासूनच प्रशासन कामाला लागले होते. सुरुवातीला राष्ट्रपतींचा दौरा हेलिकॉप्टरनेहोणार होता. सुरुवातीच्या दौºयानुसार ते सकाळी १० वाजता विमानतळावर येणार होते. वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टने १०.२५ वाजता दीक्षाभूमीवर जाणार होते. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच रामटेकला जाणार होते. ११.३५ वाजता श्री शांतीनाथ जैन मंदिराला भेट देऊन हेलिकॉप्टरने कामठीतील ड्रॅगन पॅलेस विपश्यना सेंटरला येणार होते. १२.४० ला विपश्यना सेंटरचे उद्घाटन, १२.५० ला ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना आणि १२.५५ वाजता विपश्यना सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन आदी कार्यक्रम आटोपून १.४० वाजता ते कामठी येथून पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर येणार होते आणि तेथून राजभवनावर २.२० वाजता पोहोचणार होते. परंतु ऐन वेळेवरहेलिकॉप्टरचा दौरा रद्द झाला. रस्ता मार्गाने राष्ट्रपतींचा दौरा ठरल्यानुसार आखण्याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून निर्देश आले. हेलिकॉप्टरचा दौरा रद्द झाल्याने सर्व कार्यक्रमाची वेळ किमान तासभराने वाढणार होती.
यातच शहरात सुरूअसलेल्या रस्ता व मेट्रो रेल्वेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था. अशा वेळी राष्ट्रपतींचे सर्व कार्यक्रम वेळेत आटोपून त्यांना दुपारच्या जेवणासाठी राजभवनावर ठरलेल्या वेळेत परत कसे येता येईल, हे एक आव्हानच होते. जिल्हा प्रशासनाकडे केवळ २४ तास होते. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर, प्रोटोकॉलची चमू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची सर्वांची आपात्कालीन बैठक बोलावली. त्यानुसार राष्ट्रपतींचा दौरा रस्ता मार्गे निश्चित करण्यात आला. आता ही वेळ पाळणे जिल्हा प्रशासनासाठी एक आव्हानच होते. त्यानुसार येणाºया अडचणी व त्या दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच आयोजकांशी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांनी व्यक्तिगत भेटून कार्यक्रम थोडक्यात आटोपण्याबाबत विनंती केली. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा राष्ट्रपतींना हेलिकॉप्टरने जाणे शक्य नाही, याबाबत समजले. तेव्हा त्यांनी रस्ता मार्गाने दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष निर्देश दिले.सर्व यंत्रणांवर स्वत:ही देखरेख ठेवली. त्यांच्या देखरेखीखाली सर्व अधिकाºयांनी २४ तासात आवश्यक कामे पूर्ण केली. प्रत्येक कामावर जिल्हाधिकारी कुर्वे लक्ष ठेवून होते. प्रत्येक कामाची सेकंद टू सेकं द ते माहिती घेत होते. या सर्वांचे परिश्रम आणि प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे राष्ट्रपती रस्त्यानेही राजभवनात १० मिनिटे अगोदरच पोहोचले. राष्ट्रपतींचा नियोजित दौरा वेळेतच यशस्वीपणे पार पडल्याबाबत जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदनही करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींचे विशेष हेलिकॉप्टर भोपाळमध्येच अडकून
नागपूर दौºयासाठी राष्ट्रपतींचे विशेष हेलिकॉप्टर हे गाजियाबादमधील हिंदन येथून १९ सप्टेंबरलाच निघाले. खराब हवामानमुळे ते भोपाळमध्ये उतरवण्यात आले. २० तारखेला ते नागपूरला येणार होते. परंतु भोपाळ ते इटारसीपर्यंत खराब हवामान असल्याने हेलिकॉप्टर उडू शकले नाही. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना याबाबत कल्पना देण्यात आली. त्यांनी हेलिकॉप्टरचे स्क्वॉड्रन लिडरसह सहकाºयांची भोपाळलाच विशेष व्यवस्था केली. २१ तारखेला सुद्धा ते उडाण भरू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपतींचे विशेष हेलिकॉप्टर भोपाळमध्येच अडकून राहिले.
उप्पलवाडीतील बोगद्यात रात्रभरात ड्रेन सिस्टीम तयार
रामटेकच्या मार्गात येणाºया उप्पलवाडी येथील बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून असते. या पाण्यामुळे राष्ट्रपतींच्या दौºयात अडचण येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी रात्रभरात पाणी काढण्यासाठी ड्रेन सिस्टीम तयार केली. यावर जिल्हाधिकारी कुर्वे विशेष लक्ष ठेवून होते. इतकेच नव्हे तर पाणी जमा झालेच तर ते काढण्यासाठी विशेष अधिकाºयांची एक चमू वॉटर पंप घेऊन तैनात करण्यात आली होती. याशिवायदौºयादरम्यान रेल्वे फाटक बंद राहणार नाही, याचे नियोजन करण्यात आले होते.