नागपूर : एअरफोर्स ऑफिसर असल्याची बतावणी करणाऱ्या फेसबुक फ्रेंडने विवाहित महिलेवर अत्याचार करत तिला ब्लॅकमेल केले व चार वर्षांत सातत्याने छळ करत ४.१० लाख रुपये उकळले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
श्याम सुपतकर (हनुमाननगर, मेडिकल चौक) असे आरोपीचे नाव आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेशी त्याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने श्याम वर्मा या नावाने प्रोफाईल बनविली होती व त्याने महिलेशी फोनवर बोलण्यास सुरुवात केली. त्याने तो एअरफोर्स ऑफीसर असल्याची बतावणी करत त्याची पोस्टिंग गुजरात मध्ये असल्याची थाप मारली. त्याने तो मुळचा नागपुरातील हनुमाननगरातील असल्याचेदेखील सांगितले. २३ मे २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असताना त्याने महिलेला भर दुपारी मेडिकलच्या प्रवेशद्वारासमोर बोलविले. तो कार घेऊन आला होता व त्याच्यासोबत एक मुलगीदेखील होती. त्याने ती त्याची बहीण असल्याचे सांगितले व तिघांनीही कारमध्येच कोल्ड्रींक घेतले. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली. आरोपी तिला खापरीतील एका झोपडीवजा घरात घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्याने तिचे फोटो काढले व अश्लिल व्हिडीओदेखील बनविला. तो व्हिडीओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचर केला. तसेच तिला रस्त्यात अडवून व तिच्या घरात जाऊनदेखील मारहाण केली. त्याने तिला पैशांची मागणी केली. महिलेने भितीपोटी अडीच लाख रोख व दागिने असे ४.१० लाख रुपये दिले. या प्रकाराला महिला कंटाळली होती. तिने त्याची माहिती काढली असा त्याचे खरे नाव तिला कळले. तिने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी श्यामविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मोबाईलमधून घेतले सर्व नातेवाईकांचे नंबरमहिलेवर २०२० मध्ये अत्याचार केल्यावर श्यामने तिचा मोबाईल घेतला व तिच्या फोनमधील सर्व कॉंन्टॅक्ट स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. तिच्या सर्वच नातेवाईकांचे क्रमांक त्याच्याकडे असल्याने ती दहशतीत होती. तो कधीही व्हिडीओ पाठवू शकतो या भितीने तिने त्याला पैसे दिले.
आरोपीने अनेक महिलांना केले ब्लॅकमेल
श्याम सुपतकर हा हनुमाननगर, मेडिकल चौक येथेच राहतो. त्याने वेगवेगळ्या फेसबुक प्रोफाईलच्या माध्यमातून मुलींशी फ्रेंडशीप केली व त्याचा वापर करत त्याने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. त्याच्या अटकेनंतरच आणखी तथ्य समोर येईल.