नागपूर : नवीन कायद्यानुसार मोठ्या कंपन्यांची साठेबाजी, सरकारची वाढलेली खरेदी, सरासरीपेक्षा कमी पीक आणि विदेशातून आयात कमी होत असल्याच्या कारणांनी गेल्या काही दिवसांपासून तूर डाळ आणि अन्य डाळींच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. कोरोना काळात खाद्यतेलासह सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने महागाईचा फटका गरीब आणि सामान्यांना बसत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.
होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले यंदा पीक कमी आल्याने सर्व प्रकारच्या डाळी महाग झाल्या आहेत. यातच मोठ्या कंपन्यांना डाळींचा साठा करीत आहेत. कोरोना काळात सर्व प्रकारच्या डाळींना मागणी वाढली आहे. म्यानमारमध्ये सैनिकी शासन असल्याने तेथून तुरीची आयात बंद आहे. शिवाय निर्यात सुरू असून सरकारने आयातीवर मर्यादा आणली आहे. भाववाढीनंतर बाजारात तूर, चना, मूग, उडद आदीं आधारभाव किमतीपेक्षा जास्त भावात विकल्या जात आहे. गावरानी तूर ७,८०० रुपये क्विंटल व आयातीत तुरीचे भाव ६,९०० रुपये क्विंटल तर चन्याचे ५,४०० रुपये भाव आहेत.
सर्व प्रकारच्या डाळींची हजार रुपयांपर्यंत वाढ
गेल्या काही दिवसांपासून तूर डाळ व चना डाळीचे भाव वाढत आहेत. सर्व डाळींच्या भावात ८०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरीची डाळ दर्जानुसार ९८ ते ११५ रुपये किलो, चना डाळ ६५ ते ८०, वाटाणा डाळ ७० ते ७५, मूग मोगर ९५ ते १२०, उडीद मोगर भाव ९० ते १३० रुपये, हिरवा वाटाणा १२५ ते १४० आणि काबुली चन्याचे ८५ ते ११० रुपये भाव आहेत.
तांदूळ व गव्हात तेजी
यंदा पावसामुळे पीक कमी आल्याने गहू आणि तांदळाच्या किमती प्रति क्विंटल ८०० ते हजार रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या किरकोळ धान्य बाजारात चिन्नोर दर्जानुसार ५६ ते ६५ रुपये किलो, जयश्रीराम ४७ ते ५३ रुपये, बीपीटी ३५ ते ४२ रुपये, बासमती ८५ ते १३० रुपये किलो आहे. याशिवाय गहू एमपी बोट ३२ ते ४४ रुपये किलो, लोकवन २५ ते २९ रुपये, मिल क्वालिटी २० ते २४ रुपये भाव आहेत.
मोटवानी म्हणाले, कोरोनामुळे धान्य बाजाराला ग्रहण लागले आहे. बाजारात ग्राहकांचा अभाव आहे. धंदे खराब असून वसुली होत नाही. अनेक व्यापा-यांची उधारी बुडाली आहे. लॉकडाऊन राहिले तर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. हातावर कमावून पोट भरणा-यांचा रोजगार गेला आहे. नवीन पीक दिवाळीत येणार आहे. त्यामुळे डाळी आणि धान्याचे भाव कमी होणार नाहीत.