लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व घ्यावयाची काळजी, यासंदर्भात विशेष रस्ता सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३२ वर्षांच्या सेवाकाळात अपघातविरहित वाहन चालविणारे इमामवाडा डेपोचे मोहम्मद कादीर व इमामवाडा डेपोचे इस्तृजी मेश्राम या राज्य परिवहन महामंडळातील वाहन चालकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर हे प्रामुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे, प्रकाश जैन, सोलंकी, राधा, संयोजक राजश्री वानखेडे उपस्थित होते. रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून वाहनचालकांकडून वाहतूक नियमासंदर्भात आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे रस्त्यावरील अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमाचे पालन करतानाच वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणारी जीवितहानी टळू शकते. त्यामुळे जनतेने वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवावे, असे आवाहन मार्तंड नेवासकर यांनी केले.
शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमाची माहिती सुलभपणे जनतेपर्यंत पोहचत आहे. नागपुरातील ७० टक्के ब्लॉक स्पॉट कमी केले आहे. गाडी ही आपली सोबती आहे, अशी भावना नागरिकांनी ठेवून तिची काळजी घेणे आवश्यक आहे तरच अपघात कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या चमूने व्यसन करून वाहन चालविणे कसे धोकादायक असते, याबाबत पथनाट्य सादर केले. अपघात कमी होण्यास मदत करणारे रेडियम स्टीकर चारचाकी व दुचाकीला मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले.