लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरातील विविध भागात ॲक्टिव्हावर फिरून खेळणी आणि भेटवस्तू विकण्याच्या आडून घातक मांजा विकणाऱ्या एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे यवतमाळच्या एका बड्या मांजा विक्रेत्याकडे छापा मारून पोलिसांनी त्याच्याकडून मांजाचे ३८६ रिल (चक्री) जप्त केले. अलीकडची मांजाविक्रेत्याविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
राजापेठ हुडकेश्वरमधील आरोपी दिनेश किशोर ढोरे हा ॲक्टिव्हावर फिरून खेळणीच्या आडून मांजा विकत असल्याचे कळताच एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. त्याने हा मांजा यवतमाळच्या मारवाडी चौकातील बंटी नंदकिशोर सिसोटिया याच्याकडून घेतल्याचे सांगताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त उपायुक्त डॉ. दिलीप झळके आणि उपायुक्त सारंग अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीच्या पोलीस पथकाने यवतमाळात सिसोटियाच्या गोदामावर छापा घातला. त्याठिकाणी पोलिसांना नायलॉन मांजाचे ३८६ रिल (किंमत १ लाख, ६३ हजार) आढळले. पोलिसांनी ते जप्त करून सिसोटियाला अटक केली.
---
मांजाविक्रेत्यांवर संक्रांत
घातक मांजाने गळा कापला गेल्याने प्रणय प्रकाश ठाकरे या विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. या प्रकरणाची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून मांजाविक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यवतमाळच्या व्यापाऱ्याने हा मांजा धाैलपूर दिल्ली येथून आणल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस पथक तिकडेेही कारवाईसाठी जाणार असल्याचे समजते.
----