नागपुरातील मानकापुरात क्रिकेट सट्टा अड्डयावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:36 AM2018-04-18T01:36:32+5:302018-04-18T01:36:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने मानकापुरातील पद्मावती नगरात छापा घालून क्रिकेट सट्टा अड्डा चालविणाऱ्या मोहन बेलपांडे आणि राहुल बेलपांडे (वय ३२) या दोघांना अटक केली.
बेलपांडे बंधू सराफा व्यावसायिक असून सट्ट्याची लत लागल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:च क्रिकेट सट्टा अड्डा सुरू केला. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पद्मावतीनगरातील बेलपांडेच्या घरी छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लॅपटॉप, १९ मोबाईल आणि खायवाडीचा पाना जप्त केला.
रविनगर चौकात हुक्का पार्लरवर छापा
गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती मार्गावरील रविनगर चौकात चालणाºया एका हुक्का पार्लरवर छापा मारला. तेथे एक अल्पवयीन मुलगा हुक्क्याचा धूर उडविताना दिसल्याने पोलिसांनी पार्लरचा संचालक कुणाल चौरसिया (वय ३५) याला अटक केली.
रविनगर चौकात कुणाल कोपा हुक्का पार्लर चालवीत होता. येथे अल्पवयीन मुलामुलींना हुक्का दिला जात असल्याचे कळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी तेथे छापा घातला. या छाप्यात पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा हुक्का पिताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर कुणालला अटक केली. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
तांडापेठ येथे पाण्यासाठी गोंधळ
प्रभाग २० मध्ये पाण्याची समस्या असलेल्या तांडापेठ येथील संतप्त नागरिक ांनी एक्त्र येऊन मंगळवारी गोंधळ घातला. महिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक रमेश पुणेकर घटनास्थळी पोहचले. थोड्याच वेळात ओसीडब्ल्यूचे अधिकारी पोहचले. त्यांनी नागरिकांची समस्या जाणून घेतली. तात्काळ पाणी सोडण्याचे व्हॉल्व आॅपरेटला निर्देश दिले.
माजी नगरसेविका ललिता निमजे, कमलेश भगतकर, योगेश बिनेकर, विजय पौनीकर, विशाल निमजे, वासुदेव मोहाडीकर, देवराव भागवतकर, गंगाधर बांधेकर, चेतन कुंभारे, राजेश गुप्ता, टेकचंद पौनीकर, राजश्री पौनीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
दुचाकी पेटवली
लष्करीबागमधील रहिवासी राजेश चुडामण शेंडे (वय ४८) यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली अॅव्हेंजर अज्ञात आरोपीने जाळून टाकली. मंगळवारी पहाटे ४ वाजता हा प्रकार उघडकीस आला. शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.