उत्तर नागपुरातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:52 PM2020-04-20T22:52:17+5:302020-04-20T22:54:51+5:30
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उत्तर नागपुरातील एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा घातला आणि जुगार खेळणाऱ्या आठ गर्भश्रीमंत जुगाऱ्यांना जेरबंद केले.
लोकमत नेटवर्क
नागपूर : परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उत्तर नागपुरातील एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा घातला आणि जुगार खेळणाऱ्या आठ गर्भश्रीमंत जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल्स, कार आणि इतर साहित्यासह सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यावरील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाला रविवारी रात्री एका खबऱ्याने माहिती दिली की, ऑटोमोटिव्ह चौकाजवळच्या ओबेरॉय पॅलेसमध्ये मोठा जुगार सुरू असून येथे अनेक व्यापारी जुगार खेळत बसले आहेत. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, हवालदार मंगेश देशमुख, नायक विनोद सोनटक्के, मृदुल नागरे, चेतन यादव, शिपाई नागरे, सागर आत्राम आणि योगेश राठोड यांनी तेथे छापा घातला. इमारतीच्या कम्युनिटी हॉलमध्ये आठ जण जुगार खेळताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख ५२,९१० रुपये, ९ मोबाईल, बीएमडब्ल्यू कारसह चार वाहने असा एकूण २६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरुद्ध जुगार नियंत्रक कायदा तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही वर्षात जुगार अड्ड्यावरून एवढ्या मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची नागपुरातील ही पहिली कारवाई मानली जात आहे. बड्या व्यापाºयांना जुगार खेळताना पकडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे
कृतपालसिंग सुरजनपालसिंग ओबेराय (वय ४०, रा. पाचपावली), कुलविंदरसिंग कुलवंतसिंग सुरमे (वय ३७, रा. कपिलनगर), देवेंद्र मधुकर टिपले (वय ३६, रा. पाचपावली), अजितसिंग सुखविंदरसिंग सुलतानी (वय २८, रा. पाचपावली), हर्षपालसिंग गुरविंदरसिंग बट्टा (रा. सदर), अवनीतसिंग सतनामसिंग भाटिया (रा. पाचपावली) आणि रणजीतसिंग मनजीतसिंग मुलतानी (रा. कपिलनगर).