लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आनंद लिंगायत हे प्रभाग १९ मध्ये कार्यरत असून सकाळी ७.३० सफाईच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील दखणे चौक येथे सैनी ट्रॅव्हल्सची एमएच ४९ एटी ४५३५ क्रमांकाची बस यू टर्न घेत होती. सकाळची वेळ असल्याने मार्गावर वर्दळ नव्हती. त्यामुळे बस चालकाने वेगाने यू टर्न घेतला. यात लिंगायत बसच्या समोरील चाकात आले. त्यांच्या पायावरुन बसचे चाक गेले. एक पाय पूर्णपणे निकामी झाला. दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली. ड्युटीवरील अन्य कर्मचारी व नागरिकांनी लिंगायत यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.घटनेची माहिती मिळताच आमदार विकास कुंभारे, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, नगरसेवक अॅड.संजय बालपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, महापालिका कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेश हाथीबेड यांच्यासह अधिकारी मेयो रुग्णालयात पोहचले. त्यांनी ऐवजदार कर्मचाऱ्याची माहिती घेतली. मेयो रुग्णालयात आवश्यक उपचार न मिळाल्याने मेडिकलला हलविण्यात आले. लिंगायत यांना तीन मुली आहेत. दोघींचा विवाह झालेला आहे तर एक एमबीए करीत आहे.लिंगायत कामावर असताना गंभीर जखमी झालेले असल्याने उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेकडून मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपावर नियुक्ती दिली पाहिजे, अशी मागणी राजेश हाथीबेड यांनी केली. लिगायत यांचे पाय निकामी झाले आहे. त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असेही हाथीबेड म्हणाले.अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून २५ हजाराची मदतआनंद लिंगायत यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपर आयुक्त अजीज शेख, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार रुग्णालयात पोहचले. त्यांनी उपचाराची माहिती घेतली. याची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून आर्थिक मदत जमा केली. सायंकाळपर्यत २५ हजाराची रक्कम लिंगायत यांच्या कुटुंबीयांना दिली. सैनी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तहसील पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐवजदारांना नुकसान देण्याबाबतची कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. असे असूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ हजार जमा केले. अशा प्रसंगात मदतीसाठी कार्पोरेट फं ड निर्माण करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती दासरवार यांनी दिली.खासगी बसपासून मुक्तता मिळावीगीतांजली टॉकीज व टाटा पारसी स्कूल परिसरात खासगी बसच्या रांगा लागतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघात होतात. असाच प्रकार मंगळवारी घडला. संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस येथून तात्काळ हटविण्यात याव्यात, अशी मागणी संजय बालपांडे यांनी केली.
नागपुरात खासगी बसची सफाई कर्मचाऱ्याला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:23 AM
महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत असलेले ऐवजदार सफाई कर्मचारी आनंद चिरकूट लिंगायत यांना मंगळवारी सकाळी सैनी ट्रॅव्हल्स बसने धडक दिली. बसचे समोरील चाक दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देदोन्ही पायावरुन चाक गेले :मेडिकलमध्ये जखमीवर उपचार