खासगी रुग्णालयांनी परत केले ६६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:30+5:302020-12-08T04:07:30+5:30
कोविड रुग्णांकडून जादाची वसुली : उपचाराचे अधिक पैसे घेण्याच्या २५० तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना ...
कोविड रुग्णांकडून जादाची वसुली : उपचाराचे अधिक पैसे घेण्याच्या २५० तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात शासन दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीचे शुल्क वसूल केले. यासंदर्भात २५० हून अधिक तक्रारी होत्या. मनपा प्रशासनाने अशा खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना आतापर्यंत ६६ लाख रुपये परत केले आहेत.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. शासकीय रुग्णालयात खाटा नव्हत्या. रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले. मात्र अनेक खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली ५ ते ८ लाख रुपयांची वसुली केली. या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी आल्या. याला आळा घालण्यासाठी मनपाने ऑडिटरची नियुक्ती केली. अधिक शुल्क वसुलणाऱ्यांना दंड आकारला. यात सेव्हन स्टार, विवेका, एलेक्सिस, वोक्हार्टसह अन्य रुग्णालयांचा समावेश आहे. जादा आकारणी केलेल्या काही निवडक रुग्णालयांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम परत केली. परंतु अजूनही आठ रुग्णालयांनी वसूल केलेले जादाचे दीड कोटी शुल्क अजूनही परत केले नाही.
... १.९१ कोटीचे जादा शुल्क वसूल
खासगी रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांपैकी ४,१६२ बिलांचे अंकेक्षण महापालिकेने केले. खासगी रुग्णालयांत उपलब्ध खाटांपैकी ८० टक्के खाटा शासनाने जारी केलेल्या दरसूचीनुसार आरक्षित असतात तर २० टक्के खाटांवर रुग्णालय त्यांच्या दराने बिलाची आकारणी करू शकते. तरीही काही रुग्णालयांनी ८० टक्के खाटांवर दाखल रुग्णालयांकडून जादा दराने बिलाची आकारणी केल्याचे तपासणीत आढळून आले. ७५३ देयकांमधून सुमारे एक कोटी ९१ लाख ४५ हजार ६५५ रुपये खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा वसूल केल्याचे दिसून आले.