लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नावीन्यपूर्ण संकल्पना जग सुंदर बनवू शकते. यातून शहरातील अनेक समस्या मार्गी लागू शकतात. यासाठी युवकांची मदत घेतली जात आहे. युवकांना नवीन संकल्पना मांडण्यासाठी महापालिका व्यासपीठ उपलब्ध करणार आहे. यासाठी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड २०१९ आयोजित के ले जात आहे. अवॉर्डच्या पहिल्या टप्प्यात ‘दि हॅक थॉन’ व दुसऱ्या टप्प्यात ‘द मेअर इनोव्हेशन अवॉर्ड’ असेल. उत्तम क्रिएटिव्ह सोल्युशन देणाऱ्यांना अवॉर्ड देण्यात येणार आहे. सोबतच महापालिका याची अंमलबजावणी करणार आहे.महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड २०१९ संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून अनेक समस्या सहज मार्गी लागणे शक्य आहे. इनोव्हेशन अवॉर्डची सुरुवात या वर्षापासून करण्यात आली आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी असतात परंतु त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्डच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे.हॅकथॉनच्या माध्यमातून समूह चर्चेसाठी २४ विषय निश्चित करण्यात आले आहेत. यात ग्रीन नागपूर, पिण्याच्या पाण्याचे जतन, अक्षय ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर, सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना, ड्रेनेज लाईन सफाई प्रणाली, झीरो वेस्ट मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, उंच इमारतीत अग्निशमन कार्यासाठी तंत्रज्ञान, मनपा शाळात स्मार्ट कॅम्पेन, फ्लाय अॅशचा वापर, पौष्टिक अन्नासाठी विशेष झोनचे नियोजन, आठवडी बाजार नियोजन, मनपाच्या विविध विभागात ई-गव्हर्नन्स साधने, कचरा संकलन, निर्माल्य संवर्धन, मनपा रुग्णालय, मोकाट कुत्रे आदी विषयांचा यात समावेश आहे. अवॉर्डसाठी वयोगटानुसार तीन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. यात ‘अ’ गटात वयोगट १२ ते १६,‘ ब’ गटात १५ ते २० व ‘क’गटात २० वर्षावरील लोकांचा समावेश करण्यात आला आहे.१ फेब्रुवारीपासून हॅकथॉन आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात १० उत्कृ ष्ट चमूची निवड करण्यात येणार आहे. चमूचे काम समस्यांवर पर्याय शोधण्याचे आहे. यासाठी नवीन संकल्पना मांडावयाची आहे. जे या अवॉर्डमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. नोंदणीला १६ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. स्पर्धेसाठी मार्गदर्शन २४ जानेवारीला होईल. ३१ जानेवारीला स्पर्धकांची भेट, १ फे बु्रवारीला मनपा हॅकथॉन व २ मार्चला महापौर इनोव्हेशन पुरस्कार कार्यक्रम होणार आहे. प्रथम पुरस्कार २१ हजार, दुसऱ्या क्रमांकाला ११ तर तिसऱ्या क्रमांकाला ५ हजारांचे तीन पुरस्कार राहतील, अशी माहिती महापौरांनी दिली. यावेळी नगरसेवक सुनील अग्रवाल, अपर आयुक्त राम जोशी, डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते.परीक्षा कालावधीत अवॉर्ड वितरणमहापालिकेच्या स्थापना दिनी २ मार्चला अवॉर्ड वितरण करण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून अवॉर्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. या दरम्यान १० व १२ वीची परीक्षा होणार आहे. अशा परिस्थितीत इनोव्हेशन अवॉर्डच्या आयोजनासंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे.