रामटेक : सध्या पारंपरिक पिकाचा उत्पादन खर्च बराच वाढला आहे. खर्च वगळला तर उत्पादन शून्यच अशीच अवस्था शेतकऱ्यांची आहे. पण, तेच जर जरा हटके उत्पन्न घेतले तर कमी उत्पादन खर्चात शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी चारा पीक हे उत्तम पर्याय आहे. रामटेकला सुपर नेपीयर या जातीच्या चाऱ्याची लागवड श्रीनिवास रेड्डी यांनी एक एकरात केली आहे. त्यात त्यांना अंदाजे तीन लाखांच्या वर उत्पन्न मिळाले आहे. एकदा लागवड केली की, पाच वर्षे फक्त कापणी व विक्री एवढेच करणे आहे. उसाच्या पिकासारख्या सुपर नेपीयर गवताच्या कांड्या एका एकरासाठी पाच हजार आवश्यक असतात. त्या प्रत्येकी एक रुपयात त्यांनी काचूरवाही येथून खरेदी केली. पावसाळ्यात शेतात त्याची लागवड केली गेली. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून बेड बनविण्यात आले. दीड फुटाच्या अंतरावर हे कांडे लावण्यात आले. त्यासाठी ८०० रुपये इतकी मजुरी लागली. चारा पिकाचे पहिले उत्पादन ५५ दिवसांनंतर आले. एकदा गवत कापले की त्याला पुन्हा फुटवे येतात. जमिनीतून बांबूसारखे कोंब येतात व त्यातून परत चारा निर्माण होतो. पाच वर्षे याला पाणी देण्यापलीकडे दुसरा कोणताही खर्च नाही़ सध्या या गवताला बाजारात ६ रु. प्रती किलो दर आहे. एका एकरातील गवतापासून अंदाजे ३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. या गवतामध्ये कैल्शियम व इतर पोषक घटक असतात. त्यामुळे दुभत्या जनावरांना याचा चांगला फायदा होतो. त्यामध्ये वाढ होते. तसेच हे गवत खायला गोड असते. त्यामुळे जनावरे आवडीने खातात. स्थानिक बाजारात याला मागणी कमी आहे. पण, नागपूरला मार्केटमध्ये नेले, तर मात्र चांगला नफा मिळतो. रेड्डी यांच्याकडे दुभत्या गाई असल्याने त्यांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.
--
सुपर नेपीयर गवत हे उत्तम चारा पीक आहे. याच्या लागवडीतून एकरी १५ टन उत्पन्न मिळू शकते. हिरवा चारा असल्याने पशुंना त्याचा चांगला फायदा होते. शेतकऱ्यांनी हे चारा पिक घेतले तर त्यांना आर्थिक फायदाही होतो. उन्हाळ्यात या चारा पिकाला फार मागणी असते.
- स्वप्निल माने, तालुका कृषी अधिकारी, रामटेक