लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे यंदा होळी, धुळवड, शब-ए-बारात साजरी करण्यावर नागपूर महानगरपालिकेतर्फे मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी होळी, धुळवड किंवा शब-ए-बारात साजरी करता येणार नाही, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनामुळे शहरात अगोदरच कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. होळी व धुळवडीसाठी वेगळे निर्देश काढण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी नवीन नियमावली जारी करण्यात आली. त्यानुसार २८ व २९ मार्च रोजी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेची ठिकाणे वगळून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२९ मार्च रोजी राहणार ही बंधने
- खाजगी आस्थापना, कार्यालये बंद राहणार.
-दुकाने- मार्केट बंद राहणार.
- वाचनालय- अभ्यासिका बंद राहणार.
- रेस्टॉरंट, हॉटेल्स, खाद्यगृहातील डायनिंग सुविधा बंद.
- सायंकाळी सात वाजेपर्यंत फूड डिलिव्हरी सुरू असेल.
- स्टँड अलोन स्वरूपातील किराणा, भाजीपाला दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील.