सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचे दूध म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषकद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडते. अशा बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव तयार केला होता. परंतु जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला आहे.माता म्हटल की प्रेम, वासल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. अमृतासमान असलेलं आईच्या दुधापासून नवजात अर्भक वंचित राहतात. अनाथालये आईच्या दुधाची तहान दुधाची पावडर, बाटली किंवा बालान्नाने (बेबी फूड) भागवितात. यामुळे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणून ‘मातृ दुग्ध पेढी’ची मागणी अनाथलयांकडून होत आली आहे. शासकीय रुग्णालयात याची सोय झाल्यास याचा फायदा अनाथालयांनाच नाही तर अनेक कारणांमुळे ज्या आर्इंना दूध पाजता येत नाही त्यांनाही होण्याची शक्यता आहे. मानवी दुग्ध पेढीची गरज लक्षात घेऊन मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभाग प्रमुखांनी रोटरीच्या मदतीने मानवी दुधाच्या बँकेचा प्रस्ताव मेयो प्रशासनाला दिला होता. यावर बरीच चर्चाही झाली. परंतु आता या प्रकल्पासाठी जागाच नसल्याचे कारण समोर केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, आता हा प्रकल्प मेडिकलमध्ये उभारण्याचे प्रस्तावित आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घातल्यावरच ते शक्य असल्याचे बोलले जात आहे.
पेढीतील दूध आरोग्यासाठी सुरक्षितआईच्या दुधाएवढेच हे दूध सुरिक्षत असल्याचा दावा, डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या मते बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीच्या दुधाची साठवण केली जाते. दूध हे शास्त्रोक्त पद्धतीने साठवले जाते.
अशी असणार होती ‘मिल्क बँक’बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेपक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार होते. या दुधाचा उपयोग अपुऱ्या दिवसांच्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बाळांसाठी केला जाणार होते. शिवाय ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळाला पाजण्यासाठी अजिबातच दूध येत नाही त्यांना किंवा आईने सोडून दिलेल्या बाळासाठी मातृदुग्ध पेढीतील दुधाचा उपयोग होऊ शकतो.