महापालिका : मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे नागपूर : केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने या योजनेंतर्गत २०० बसेस खरेदी व प्रवासी वाहतुकीबाबतचा १४४.२३ कोटींचा प्रस्ताव तयार के ला असून तो मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे. यात २० वातानुकूलित बसेस तर १८० साध्या बसेसचा समावेश आहे. तसेच डेपो, टर्मिनल निर्माण व विविध विकास कामांचा समावेश आहे. या बाबतचा विस्तृत आराखडा मे.आलिया कन्सल्टिंग सोल्युशन प्रा.लि. मुंबई यांनी तयार केला आहे. प्रस्तावित बसेस ४५ सीटर असून २०० बसेसची किंमत ९१ कोटी गृहीत धरण्यात आली आहे. तसेच सोमलवाडा, कामठी, पारडी, वाडी, हिंगणा, नागपूर-१ व नागपूर-२ अशा सात ठिकाणी डेपो व टर्मिनल उभारण्याचे प्रस्तावित आहे. डेपो निर्माण व आवश्यक सुविधांवर ४५.६० कोटी, प्रवासी निवाऱ्यावर ४.५० तर जीपीएस व अन्य सुविधांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जेएनएनयूआरएम योजना बंद केली असली तरी केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची मनपाला अपेक्षा आहे. सध्या मनपाच्या २४० व व्हीएनआयएल च्या २३० बसेस आहेत. परंतु यातील जेमतेम १५० बसेस शहरात धावत आहेत. (प्रतिनिधी)
२०० बसेस खरेदीचा प्रस्ताव!
By admin | Published: January 05, 2015 12:45 AM