समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

By यदू जोशी | Published: December 15, 2023 04:51 AM2023-12-15T04:51:49+5:302023-12-15T04:53:06+5:30

प्रवाशांची मोठी पसंती

Prosperity Highway is turning out to be a game changer 60 lakh vehicles were run in a year | समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

यदु जोशी

नागपूर :  महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळाने बांधलेला समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरत आहे. या महामार्गावर वर्षभरात ६० लाख वाहनांनी ये-जा केली. ४२१ कोटी रुपयांचा टोल भरला गेला. लोकांनी फार मोठ्या प्रमाणात या ‘समृद्धी’ला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीच्या टप्पा एकचे उद्घाटन झाले होते.   समृद्धीच्या रचनेत दोष असल्याने अपघात होतात, हा तर्क निराधार असल्याचे अपघातांची कारणे बघितली असता स्पष्ट होते.

‘एमएसआरडीस’ने ‘सेव्ह लाइफ इंडिया’कडून प्रत्येक दुर्घटनेचे विश्लेषण करून डेटा तयार केला आहे. ६० लाख वाहनांनी ये-जा केली व त्यातील केवळ ७५ वाहनांचे अपघात हे जीवघेणे ठरले. अपघातावरील उपाययोजनांचे परिणाम दिसत आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी ‘लोकमत’ला दिली.

विधिमंडळ अधिवेशनासाठी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी हे समृद्धी महामार्गानेच नागपूरला पोहोचले. सर्वपक्षीय आमदारांनी या मार्गाचे कौतुकच केले. हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे राज्याची भाग्यरेषा आहे. त्याचवेळी या महामार्गावर मध्येमध्ये फूड कोर्ट असावेत, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी, असा  प्रातिनिधिक सूर आहे.

ही आहेत दुर्घटनांची कारणे

घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने केलेले ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, वाहन सुस्थितीत नसणे, वाहन अवैधरीत्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षेविषयी न घेतलेली काळजी, चालक सतर्क नसणे, वाहनांतील बिघाड, आग लागणे, वाहनांचा तोल जाऊन ते उलटणे, प्राणी अचानक वाहनासमोर येणे ही अपघातांची विविध कारणे होती.

१४३ मृत्यू अन् त्यांची कारणे

अपघाताचे कारण        अपघात मृत्यू

वाहनावरील नियंत्रण सुटले  २१           ३५

झोप लागल्याने अपघात      ११         १८

टायर फुटले                    ०९            ११

तांत्रिक बिघाड                 ०१            ०२

मागून ठोस मारणे             ११              २६

अतिवेग                              ०८            ११

आग                             ०१         २५

मागून आदळणे                ०२            ०४

इतर                                 ११         ११

महामार्गावरच्या उपाययोजना

महामार्ग सुरक्षा पोलिसांना १५ अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स वाहने पेट्रोलिंगसाठी देण्यात आली.

परिवहन विभागास ८ वाहने देण्यात आली.

राज्य सुरक्षा मंडळाचे कर्मचारी संपूर्ण महामार्गावर तैनात करण्यात आले.

डायल १०८ सेवा, ही महामार्गालगतच्या ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यात आली आहे. अपघातानंतर ५ ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते.

वाहनचालक दारू प्यायलेला आहे का, याची तपासणी केली जाते. वाहने कशी चालवावीत याचे समुपदेशन केले जाते.

चालकाला झोप येऊ नये यासाठी विशिष्ट अंतरावर रंगीबेरंगी शिल्पकृतींची उभारणी.

नागपूरला येताना मी, भारती लव्हेकर, मोनिका राजळे, गीता जैन, मनीषा चौधरी, सीमा हिरे या आमदारांनी समृद्धीने प्रवास केला. वेगाची मर्यादा पाळली व वाहतुकीचे सर्व नियम पाळले तर या महामार्गावर कोणताही धोका नाही. हा नावाप्रमाणे समृद्धी महामार्ग आहे.

- मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार

Web Title: Prosperity Highway is turning out to be a game changer 60 lakh vehicles were run in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.