वकिली व्यवसायाची महानता प्राणापलिकडे जपा : आशुतोष कुंभकोणी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:17 PM2019-08-17T23:17:08+5:302019-08-17T23:20:01+5:30
वकिली हा महान व्यवसाय असून त्याची महानता प्राणापलिकडे जपा, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वकिली हा महान व्यवसाय असून त्याची महानता प्राणापलिकडे जपा, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोव्याच्या सदस्यपदी निवडून आलेले अॅड. अनिल गोवारदीपे व अॅड. पारिजात पांडे यांचा अधिवक्ता परिषदेच्या नागपूर जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अन्य प्रमुख अतिथींमध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता, वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल, हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रम धरमपेठेतील वनामती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. तिसरे सत्कारमूर्ती अॅड. असिफ कुरेशी हे वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही.
वकिली व्यवसायात यश मिळविण्यासाठी केवळ कष्ट घेण्याची तयारी व प्रामाणिकपणा हवा असतो. या व्यवसायात यशाचा शॉर्टकट नाही असे कुंभकोणी यांनी पुढे बोलताना सांगितले.
सामान्य व्यक्तींना न्याय व्यवस्थेकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सध्या सुमारे ६० टक्के पीडित विविध कारणांनी न्यायालयापर्यंत पोहचत नाहीत हा चिंताजनक विषय आहे. बार कौन्सिल वकिली व्यवसायाच्या विकासाकरिता सतत प्रयत्न करीत असते. याशिवाय अन्य समस्या सोडविण्यासाठीही कौन्सिल पुढाकार घेत असते असे अनिल सिंग यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सदस्यांनी वकिलांच्या हितासाठी शक्य होईल त्या सर्व गोष्टी कराव्यात असे आवाहन धर्माधिकारी व गुप्ता यांनी केले. निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व वचने पूर्ण करण्याची ग्वाही सत्कारमूर्तींनी दिली. जिल्हा शाखेच्या अध्यक्षा अॅड. पल्लवी खरे, सचिव अॅड. दीपक गादेवार, अॅड. गणेश खानझोडे, अॅड. हर्षवर्धन धुमाळे, अॅड. ऋषिकेश मराठे, अॅड. मृणाल नाईक, अॅड. संगीता जाचक, अॅड. चंदू लहाबर, अॅड. कीर्तीकुमार कडू, अॅड. नीलेश गायधने, अॅड. ऋषिकेश ढाले आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.