'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 03:39 PM2022-06-27T15:39:05+5:302022-06-27T16:11:38+5:30
नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती.
नागपूर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर येथे या संतप्त कार्यकर्त्यांनी नागपूर-गोंदिया रेल्वे अडवण्यात आली असून आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यं हटणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
नागपुरात युवा काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजनी रेल्वे स्थानकावर हे रेले रोको आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करून अग्निपथ योजनेविरोधात नारेबाजी केली. अजनी रेल्वे स्थानकावरून गोंदियाकडे जाणारी ही ट्रेन आंदोलनकर्त्यांनी अडवली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन त्यांनी अडवून ठेवली होती. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. सरकार जोपर्यंत आमच्या मागणीची दखल घेत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, येथेच बसून राहू अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती.
दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रेल्वे रुळावरून हटविले व रेल्वेचा मार्ग मोकळा करून दिला. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचे पाहायला मिळाले.