महानगर शाखेतर्फे काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:50 PM2019-02-22T23:50:03+5:302019-02-22T23:50:31+5:30
नाटककार व नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात काही कलावंत काळे कपडे व कपाळाला काळे कापड बांधून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत पोहचले. त्यामुळे सुरळीत चाललेल्या नाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोटही लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाटककार व नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात काही कलावंत काळे कपडे व कपाळाला काळे कापड बांधून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत पोहचले. त्यामुळे सुरळीत चाललेल्या नाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोटही लागले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेकडून नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगर शाखासुद्धा नाट्यकलावंतांचीच आहे. मात्र या शाखेच्या पदाधिकारी, कलावंतांना संमेलनात विश्वासात न घेता डावलण्यात आल्याचा आरोप सलीम शेख यांनी आधीच नोंदविला होता. आम्ही संमेलनात सहभागी होणार नाही व निषेध नोंदवू असे सलीम शेख यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार दिंडी सुरू होताना चिटणीस पार्कजवळ हे कलावंत काळ्या फिती लावून मूक निषेध नोंदविण्यास उभे होते. संमेलनास आमचा विरोध नाही व ते सुरळीत पार पडावे, ही आमची इच्छा आहे. मात्र आम्हाला डावलण्यात आल्याचा निषेध आम्ही नोंदवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यादरम्यान अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शिष्टाई करीत सलीम शेख यांच्याशी संवाद साधला. गळाभेट करीत पुढे चर्चा करण्याचा विश्वास देत त्यांना संमेलनात सहभागी होण्याचा आग्रह धरला व ओढतच दिंडीत सहभागीही करून घेतले. सलीम शेख व त्यांचे सहकारी कलावंतही दिंडीच्या संपूर्ण मार्गात पायी चालले.
आवडत्या कलावंतांना पाहून थबकले प्रेक्षक
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून नाट्य दिंडीला सुरुवात झाली तेव्हा अ.भा. मराठी नाट्य परिषद व नागपूर शाखेचे पदाधिकारी व शहरातील नाट्यकर्मी सहभागी झाले होते. मात्र दिंडी जशी पुढे सरकत गेली तसे टीव्हीवर, चित्रपटांमध्ये दिसणारे एक एक कलावंत दिंडीसोबत जुळत गेले. मोहन आगाशे, मोहन जोशी, तेजश्री प्रधान, के दार शिंदे, डॉ. विलास उजवणे, भरत जाधव, प्रेमा किरण, वैभव मांगले, विनय पाठक, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर, मंगेश कदम, अलका कुबल-आठल्ये, रवींद्र बेर्डे, राजन भिसे, रेशम टिपणीस, तुषार दळवी, संतोष जुवेकर, अभिजित गुरू, मधुरा वेलणकर, डॉ. गिरीश ओक, ऋतुजा देशमुख, वंदना गुप्ते, सुकन्या कुळकर्णी यांच्यासह नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज या दिंडीत पायी चालत होते व या सर्व आवडत्या कलावंतांना पाहून प्रेक्षकही थबकून गेले.