Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात कुंभारेंच्या विरोधात दटके समर्थकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 07:55 PM2019-10-02T19:55:19+5:302019-10-02T19:56:31+5:30
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी महाल, बडकस चौकात विकास कुंभारे यांच्याविरोधात सकाळी ९ वाजता नारे-निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाने मंगळवारी विधानसभानिहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी महाल, बडकस चौकात विकास कुंभारे यांच्याविरोधात सकाळी ९ वाजता नारे-निदर्शने केली.
कार्यकर्ते म्हणाले, कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपाने जातीचे राजकारण करून प्रवीण दटके यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आहे. कार्यकर्त्याने पदाची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर काम करीत राहावे, असे तिकिट वाटपावरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत दिसून येत आहे. पक्षाने कुंभारे यांना दिलेल्या तिकिटाचा पुनर्विचार करून दटके यांना उमेदवारी द्यावी, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. काही कार्यकर्ते म्हणाले, जातीला वा भाजपाला विरोध नाही, पण निरंतर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलू नये.
खऱ्या कार्यकर्त्याला तिकिट द्यावे
पक्षासाठी निरंतर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट द्यावे. त्याला डावलता कामा नये. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते असून भाजपाचेच काम करू. ही बाब नेते नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे.
राहुल खंगार, भाजपा कार्यकर्ते.
जात पाहून तिकिट देऊ नये
विकास कुंभारे यांना जातीच्या आधारावर तिकिट दिले आहे. या भागात अनेकजण अविरत काम करीत आहे. त्यांना पक्षाने डावलले आहे. युवा नेते प्रवीण दटके यांना तिकिट द्यावे.
राजेश गांधी, भाजपा कार्यकर्ते.
खऱ्या कार्यकर्त्याला डावलू नये
उमेदवाराच्या जातीला विरोध नाही. जो निरंतर कार्य करतो, त्याला तिकिट मिळालेच पाहिजे. पण मध्य नागपुरात जात पाहून तिकिट दिली आहे. या मतदार संघासाठी प्रवीण दटके सक्षम उमेदवार होते.
कमलेश नायक, भाजपा कार्यकर्ता.
भाजपा जातीच्या राजकारणाबाहेर काम करते
कुठलीही व्यक्ती जातीला घेऊनच असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुसºयाबद्दल वाटणे स्वाभाविकच आहे. भाजप जातीचे राजकारण करीत नसून त्याबाहेर जाऊन काम करते. त्यात अंतिम माणसाचा विकास कसा होईल, याचा विचार करते. तिकिट वाटप करताना एक आनंदी होतो, तर दुसरा दु:खी होतो. कार्यकर्ते समजूतदार असून ते पुन्हा कामाला लागतील. कुठेही निराशा राहणार नाही. जिल्ह्यातील १२ ही जागा आम्ही जिंकू.
आ. गिरीश व्यास, भाजपा प्रवक्ते.
आंदोलनात राहुल आसरे, आनंद शाह, सचिन बढिये, सुनील गाढवे, जीवन हलमारे, केशव भिवापूरकर, संजय जैन, नितीन बढिये, श्रीकांत गाढवे, शिवाजी सिरसाट, जयदीप नाकोडे, नीलेश बिंड, दिलीप घनरे, राजेंद्र पुरी, नरेंद्र मोहिते, जगन्नाथ सपेलकर, शशांक वानखेडे, अजय सालवनकर, सचिन तारे, रमाकांत बगले, सोनू चव्हाण, रूपेश डोणगावकर, अण्णा अयाचित, वामन शिंदे, दुर्गेश पेटकर, सुधीर हेमणे, मनीष वानखेडे, राजेश कन्हेरे, सचिन नाईक, धीरज चव्हाण, सचिन सावरकर, तोमेश्वर पराते, शैलेश शुक्ल, दीपांशु लिंगायत, राजेश नंदेश्वर आणि २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.