नागपुरात वीज बिल दरवाढीविरोधात जागोजागी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:52 PM2020-07-04T21:52:12+5:302020-07-04T21:55:08+5:30
शहर भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातून वीज बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर भाजपने वीजबिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातूनवीजबिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
शहरातील २०३९ बूथस्तरावर झालेल्या या निदर्शनात वाढीव वीज बिल रद्द करावे, लॉकडाऊनच्या कालावधीत ३०० युनिटपर्यंत वीज बिल व अधिकार रद्द करावा, एका वर्षासाठी विद्युत शुल्क रद्द करण्याची मागणी केली. शहर अध्यक्ष प्रवीण दटके म्हणाले, सरकारने अजूनही वीज बिल रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही, जोपर्यंत जनतेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. पुढे यासाठी ऊर्जामंत्र्यांचा घेराव करण्यात येईल. भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रतापनगर व हुडकेश्वर चौक येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाले. दटके यांनी टिळक पुतळा, खासदार डॉ. विकास महात्मे छत्रपती चौक, आमदार कृष्णा खोपडे शहीद चौक, आमदार विकास कुंभारे गोळीबार चौक येथील आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचप्रकारे खामला चौकात प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, लोकमत चौकात महापौर संदीप जोशी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत व्हेरायटी चौक, माजी खासदार अजय संचेती लक्ष्मीभवन चौक, आमदार गिरीश व्यास राणी दुर्गावती चौक, आमदार अनिल सोले शंकरनगर चौक, आमदार मोहन मते मेडिकल चौक, माजी आमदार डॉ. मिलिंद माने कमाल चौकातील आंदोलनात सहभागी झाले होते.
येथे झाली निदर्शने
पार्टी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. अजनी चौक, शताब्दी चौक, त्रिमूर्तीनगर, अग्रेसन चौक, भारतमाता चौक, बडकस चौक, प्रतापनगर, लोकमत चौक, माटे चौक, शताब्दी चौक, नरेंद्रनगर चौक, अंबाझरी टी-पॉईंट, शहीद चौक, पारडी, टेलिफोन एक्सचेंज चौक, छापरूनगर, राणी दुर्गावती चौक, इंदोरा चौक, भीम चौक, कडबी चौक, व्हेरायटी चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर चौक, एलएडी चौक, रामनगर, सदर, लॉ कॉलेज, मेडिकल, सक्करदरा, रेशीमबाग, मानेवाडा या चौकांमध्ये आंदोलन करण्यात आले. गिट्टीखदान चौकात वॉर्ड अध्यक्ष धनराज रमेश तेलंग यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनात मनपा सत्तापक्ष नेता संदीप जाधव व मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, नगरसेवक प्रमोद कन्हेरे सहभागी झाले होते.