जनतेने जबाबदारी दिल्यास स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:09 AM2019-08-28T05:09:17+5:302019-08-28T05:10:09+5:30
आदित्य ठाकरे यांचे सूचक विधान; उपमुख्यमंत्रिपदाचा पेपर आताच फोडणार नाही
नागपूर : भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांत विधानसभा निवडणुकांसाठी युती होईलच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेपूर्वी पत्रपरिषदेत दिलेल्या शब्दांवर आम्ही कायम राहणार आहोत. सध्याच उपमुख्यमंत्रिपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्वीकारेल, असे सूचक विधान शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मंगळवारी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात पोहोचली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीमधील जागावाटपाबद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युतीबद्दल चर्चा झाली आहे. तेच याबद्दल बोलतील. मी निवडणूक लढवायची की नाही, कुठून लढवेल हे जनता ठरवेल. राज्यात सध्या विरोधकच नाहीत, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या काही नेत्यांवर खंडणीखोरीचे आरोप लागत आहे. याबाबत विचारले असता आदित्य यांनी ठोस उत्तर दिले नाही. परंतु अशा नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.
कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी
यावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफीवरून राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.
कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यासाठी सरकारची मदत केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यकर्ते मदत करत आहेत.
जेथे सरकारकडून समस्या सुटत नाही तेथे शिवसेना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.