अतिरिक्त पोलीस महासंचालक रामानंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:05 PM2020-09-29T23:05:10+5:302020-09-29T23:06:19+5:30
अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधारसेवा) सुनील रामानंद यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त
पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधारसेवा) सुनील रामानंद यांनी व्यक्त केले.
नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे रामानंद यांच्या ‘कॉप्स इन कॉगमायर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी प्रेस क्लबमध्ये पार पडला. यावेळी रामानंद बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त
अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
चिरंजीव प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस
आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, प्रेस क्लबचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र आणि पोलीस उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित होते.
देश आणि समाज सेवा करणे हे सर्वांत मोठे कार्य आहे. त्यामुळे लोकसेवकांना स्वत:चे छंद जोपासायला वेळ मिळत नाही. पुस्तक लिहिणे आव्हानात्मक आहे. मात्र रामानंद यांचे ‘कॉप्स इन
कॉगमायर’ हे पुस्तक अतिशय सुंदर असून त्यांनी ते लिहिण्यासाठी खूप
परिश्रम घेतले. हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना सात वर्षे लागली. त्यावरून पोलीस कोणतेही आव्हान सहज आणि चांगल्या प्रकारे पेलू शकतात, असे यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामानंद यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी केले.