‘सी-२०’च्या पाहुण्यांकडून गुढीचे पूजन अन् नंतर घडले वाघोबांचे दर्शन
By योगेश पांडे | Published: March 22, 2023 03:07 PM2023-03-22T15:07:52+5:302023-03-22T15:08:13+5:30
पेंचमध्ये जाणून घेतली जल, जमीन, जंगलाची भारती संस्कृती : वैचारिक मंथनानंतर देशविदेशातील प्रतिनिधी निसर्गाच्या सानिध्यात
नागपूर : संपूर्ण नागपुरात गुढीपाडव्याच्या निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना ‘जी-२०’अंतर्गत आयोजित ‘सी-२०’च्या देशविदेशातील प्रतिनिधींमध्येदेखील याबाबत उत्साह दिसून आला. विशेषत: विदेशातील पाहुण्यांमध्ये या नववर्षाबाबत जाणून घेण्यासाठी विशेष उत्साह दिसून आला. पेंच प्रकल्पात उभारण्यात आलेल्या गुढीचे पाहुण्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात पूजन केले व सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सी-२०’ प्रतिनिधींना जंगल सफारी व गुढीपाडवा असा दुहेरी आनंद लुटण्याची संधी मिळाली.
मंगळवारी सकाळी बहुतांश प्रतिनिधी नागपुरातून पेंच प्रकल्पाच्या दिशेने रवाना झाले. पेंच व्याघ्र प्रकल्पात पाहुण्यांना जल, जमीन, जंगलाशी एकरूप असलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले. यावेळी बांबुवनातून जाताना वाघाच्या जोडीचे दर्शन घडले व सर्वांच्या अंगावर रोमांच उभे झाले. येथील पानझडी जंगलात पेंच नदी, तोतलाडोह ओढा, पेपडी कुंड, हत्तीगोटा, राणीडोह मार्गे सुरु झालेल्या या प्रवासात अर्जुन, धावडा, तेंदू ,भेरिया, एन वृक्षांचे दर्शन घडत होते व या वृक्षांविषयी गाईड माहिती देत होते.
सफारीदरम्यान कोल्ह्यांची सुंदर जोडी, हरणांचे कळप, मोर, सांबर, रानकोंबड्या आदी प्राण्यांनी दर्शन दिले. ग्रे हॉर्नबिल, रूपर्ड ट्रिपॉय, रुडीसल डक, ब्लॅक स्टार्क आदी पक्षांचेही दर्शन घडले. वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले. यावेळी त्यांना वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
‘जी-२०’च्या मागील सत्राचे आयोजक असलेल्या इंडोनेशियाच्या ‘सी-२०’चे शेरपा माफ्तुचान, ‘सी-२० ट्रॉयका’ सदस्य ब्राझीलच्या अलेसेंड्रा निलो, भारताचे ‘सी-२०’ शेरपा विजय नांबियार यांच्या नेतृत्वात ‘सी-२०’ प्रतिनिधींनी हा प्रवास केला.