हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 09:03 PM2019-02-14T21:03:01+5:302019-02-15T07:00:18+5:30
पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.
नागपूर : पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर जशात तसे उत्तर द्या, अशी मागणीच केली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले आहे.
आम्ही आजवर खूप झेलले आहे. आजचा दहशतवादी हल्ल्याचा प्रसंगदेखील तसाच अहे. मागील दोन ते तीन वेळा जशास तसे उत्तर देण्यात आले. त्यामुळे एक विश्वास वाढला होता. सैनिकांवर झालेला हल्ला हा भ्याड असून आता प्रत्युत्तर दिलेच गेले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.
वाढत्या कारवाईमुळे भ्याड पाऊल
संघातर्फे ‘ ट्विटर’वरदेखील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात होत असलेल्या कारवाईमुळे आलेली निराशा व हताशा या भ्याड हल्ल्यातून दिसून येत आहे. या घटनेतील दोषींना धडा शिकविण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. तर या परिस्थितीत संघ सैन्यदल व सरकारसोबत आहे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये : राष्ट्रसेविका समिती
दरम्यान, संघ परिवारातील विविध संघटनांनी या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या जवानांच्या कुटुंबियांसमवेत संपूर्ण समाज उभा ठाकला पाहिजे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. यासाठी सरकारने या हल्ल्याचे योग्य उत्तर देत कठोर पावले उचलली पाहिजेत, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सितागायत्री अन्नदानम् यांनी व्यक्त केले आहे.