खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:52+5:302021-02-23T04:11:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे, परंतु शहरात पानटपऱ्यांची संख्या वाढत असून, खर्रा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे, परंतु शहरात पानटपऱ्यांची संख्या वाढत असून, खर्रा शाैकिनांच्या ताेंडातून बाहेर पडणारी पिचकारी काेराेना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर भिवापूर पाेलिसांनी माेहीम हाती घेत, शहरात खर्राची विक्री करणाऱ्या सात पानटपरीधारकांवर रविवारी (दि.२१) दंडात्मक कारवाई केली. यात पाेलिसांनी दाेन हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
शहरात सुमारे २०० वर पाणटपऱ्या असून, बंदी असलेल्या सुगंधित तबांखूचा खर्रा मोठ्या प्रमाणात विक्री होताे. संसर्गजन्य परिस्थितीत पानटपऱ्यांवरील गर्दी धाेकादायक ठिकाण असले, तरी खर्रा खाऊन तोंडातून बाहेर पडणारी थुंकी संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याने, प्रशासनाने त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे काेराेना साखळी ताेडण्यात यश आल्यानंतर, आता पुन्हा काेराेनाबाधितांची संख्या वाढत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजना म्हणून प्रशासनाने गर्दीची ठिकाणे व संसर्ग वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर विशेष नजर फिरविली आहे.
याचाच भाग म्हणून भिवापूरचे प्रभारी ठाणेदार यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी रविवारी सायंकाळी शहरातील बहुतांश पानटपऱ्यांची झडती घेतली. खर्राची विक्री करणाऱ्या सात पानटपरीधारकांवर कारवाई करीत, त्यांच्याकडून २,२०० रुपये दंड वसूल केला, तसेच त्यांच्याकडून सुगंधित तंबाखू व खर्रा आदी साहित्य जप्त केले. सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पोलीस कर्मचारी राजेंद्र डहाके, दीपक जाधव, रवींद्र लेंडे यांच्या पथकाने केली.
....
शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास विक्री
सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असली, तरी त्याची बेधडक विक्री केल्या जात आहे. शाळा-महाविद्यालय व शासकीय कार्यालयाच्या ठरावीक अंतरावर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, बहुतांश पाणटपरी या शाळा-महाविद्यालय व शासकीय कार्यालयांना अगदी खेटून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.