लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) तीन इंटर्न्सकडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे प्रकरण सामोर आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या तिन्ही इंटर्न्सची इंटर्न्सशीप थांबविण्याचे आदेश दिले. सोबतच वसतिगृह सोडत असल्याचेही त्यांच्याकडून लिहून घेतले.चार वर्षांचा दंतवैद्यक अभ्यासक्रम अर्थात ‘बीडीएस’ केल्यानंतर त्याच महाविद्यालयात एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. या इंटर्नशिपनंतरच डॉक्टर ही पदवी दिली जाते. शासकीय दंत महाविद्यालयात यावर्षी इंटर्नशिप करणाऱ्या ४० इंटर्न्समधून सहा जणांनी वसतिगृहच सोडले नव्हते. महाविद्यालय प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्यानंतर तीन इंटर्न्सनी (आंतरवासी) वसतिगृह सोडले, मात्र तीन इंटर्न्स वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या खोल्या बळकावून राहत होते. महाविद्यालय प्रशासनाने त्यांना वारंवार वसतिगृह सोडण्याची नोटीसही बजावली. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी अॅण्टी रॅगिंग समितीचे एक पथक अचानक वसतिगृहात धडकले. यावेळी हे तिन्ही इंटर्न्स विद्यार्थ्यांना रागवत असल्याचे दिसून आले. पथकाने या संदर्भातील आपला अहवाल अधिष्ठात्यांकडे सोपविला. याची गंभीर दखल घेत रॅगिंग होत असल्याचा संशय व्यक्त करीत त्या इंटर्न्सना तातडीने वसतिगृह रिकामे करण्याची पुन्हा नोटीस बजावली. यात वसतिगृह रिकामे न केल्यास इन्टर्नशीप पूर्ण करता येणार नाही, असा इशाराही दिला. शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या प्रकरणाला घेऊन समिती नेमली. या समितीने त्यांच्या वागणुकीत सुधारणा होईपर्यंत काही दिवसांसाठी त्यांची इंटर्नशीप थांबविण्याचा निर्णय दिला. तसे पत्रही त्या इंटर्न्सला दिले. वसतिगृह सोडत असल्याचेही त्या इंटर्न्सकडून लिहून घेतले. प्राप्त माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल महाविद्यालय प्रशासनाने तयार करून ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ला पाठविला जाणार आहे.कारवाईचे अधिकार विद्यापीठालाया संपूर्ण प्रकरणाचा अहवाल लवकरच ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक’ला पाठविण्यात येईल. इंटर्नशीप रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठाला आहेत. तूर्तास त्यांची इंटर्नशीप पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय