राहुल आग्रेकरच्या अपहरणकर्त्यांना आत्मविश्वास नडला अन् त्यांचा प्लॅन गडबडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:22 PM2017-12-02T14:22:05+5:302017-12-02T14:25:20+5:30

राहुल आग्रेकरच्या अपहरण आणि हत्याकांडाचा कट फुलप्रूफ आहे, त्यामुळे आपल्यापर्यंत पोलीस पोहचूच शकणार नाही, असा आमचा विश्वास होता.

Rahul Agrekar's kidnappers got confidence and his plan got disturbed | राहुल आग्रेकरच्या अपहरणकर्त्यांना आत्मविश्वास नडला अन् त्यांचा प्लॅन गडबडला

राहुल आग्रेकरच्या अपहरणकर्त्यांना आत्मविश्वास नडला अन् त्यांचा प्लॅन गडबडला

Next
ठळक मुद्देरायपूरच्या लॉजमध्ये लावला गळफास राहुल आग्रेकर हत्याकांडाचा मुख्य आरोपी

नरेश डोंगरे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राहुल आग्रेकरच्या अपहरण आणि हत्याकांडाचा कट फुलप्रूफ आहे, त्यामुळे आपल्यापर्यंत पोलीस पोहचूच शकणार नाही, असा आमचा विश्वास होता. अपहरण आणि हत्येसारखा गुन्हा केल्यानंतरही राहुलच्या कुटुंबीयांकडून सहजपणे एक कोटी रुपये मिळतील. खंडणीची ही रक्कम मिळाल्यानंतर आपण कर्ज फेडून उजळ माथ्याने फिरणार होतो, अशी माहितीवजा कबुलीजबाब या प्रकरणातील आरोपी पंकज हारोडेने पोलिसांकडे दिला आहे.
राहुलसोबत अनेक वर्षांपासून दुर्गेश बोकडेचे संबंध होते. त्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहे. त्याचे अपहरण करून कुटुंबीयांना धाक दाखवल्यास सहजच एक कोटी रुपये मिळतील, असे दुर्गेश सांगत होता.
पोलिसांनी पकडले तर कसे, असा प्रश्न पंकजला पडला होता. त्यावर खुलासा करताना आरोपी दुर्गेश फाजिल आत्मविश्वास दाखवत होता. आपण अपहरण आणि हत्येसारखा गुन्हा करू, मात्र पोलीस आपल्याला शोधूच शकणार नाही, असे तो म्हणायचा. पोलीस पकडणारच नाही, एवढा गैरसमज आरोपी कसा काय, बाळगत होते, असा प्रश्न एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला विचारला असता, आरोपी पंकजने केलेला खुलासा आरोपींच्या धूर्त आणि शातिरपणाचा परिचय देणारा ठरला. शक्यतो, गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती (प्रत्यक्षदर्शी) ओळखत असला किंवा गुन्ह्यात मोबाईलचा वापर केला किंवा ज्या वाहनांचा वापर केला त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांना माहीत पडल्यास आरोपी पकडले जातात. दुर्गेशने अपहरणाचा कट एवढ्या सफाईने रचला होता की, या सर्व मुद्याची त्याने काळजी घेतली होती. प्रत्यक्षदर्शी केवळ राहुलच होता. तोच संपल्यामुळे दुसरे कुणी आरोपीचे नाव सांगणारा उरत नाही. दुसरे म्हणजे, गुन्ह्यात वापरण्यासाठी त्याने अनेक दिवसांपूर्वीच दुसऱ्याच्या नावे मोबाईलचे सीमकार्ड मिळवले होते. शिवाय, दोन्ही आरोपींनी गुन्ह्यादरम्यान स्वत:चा मोबाईल वापरलाच नाही. (गुन्हा केल्यानंतरही आरोपींनी राहुलचे सीमकार्ड वापरले. त्यानंतर हावडा आणि रायपूरहून फोन करताना त्याने दुसऱ्याच व्यक्तीला मोबाईल मागून त्याचा वापर केला होता). गुन्ह्यात जी बोलेरो वापरली, तिची बनावट नंबरप्लेटही आधीच बनवून घेतली होती. त्यामुळे आपल्याला पोलीस पकडूच शकणार नाही, असे आरोपींना वाटत होते.

सकाळी गुन्हा, रात्री मालामाल
सकाळी गुन्हा करायचा अन् धाक दाखवून राहुलच्या कुटुंबीयांकडून एक कोटीची खंडणी उकळायची. रात्री कर्ज वाटप करायचे अन् नंतर उजळ माथ्याने रोजच्या सारखे मुक्तपणे फिरायचे. मालामाल झाल्यानंतर मनसोक्त अय्याशी करायची, असे स्वप्नही आरोपींनी रंगविले होेते. मात्र, त्यांचा फुलप्रूफ प्लॅन फेल झाला अन् स्वत:ला खूप हुशार समजणाऱ्या आरोपी दुर्गेश बोकडेला गळफास लावून आत्महत्या करावी लागली.


पंकज हादरला
दुर्गेश बोकडेने आत्महत्या केल्याचे वृत्त एका पोलिसामार्फत शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास पंकज हारोडेला कळले. त्यानंतर तो मटकन् खाली बसला. त्यानेच हे निर्घृण हत्याकांड घडविण्यासाठी चिथावणी दिली. गुन्ह्यात सहभागी करून घेतले आणि पोलिसांनी पकडताच तो कायमचा पळून गेला, असे तो बरळू लागला. तो असे करू शकतो, असे आपल्याला वाटत होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: Rahul Agrekar's kidnappers got confidence and his plan got disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा