राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:21 PM2019-04-05T23:21:41+5:302019-04-05T23:23:57+5:30
वर्धा येथील जाहीर सभा आटोपून अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे दिल्लीला रवाना होण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे शेवटी राहुल गांधी कारने नागपूरला पोहचले व रात्री ७.४५ च्या सुमारास चार्टर फ्लाईटने दिल्लीला रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा येथील जाहीर सभा आटोपून अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे दिल्लीला रवाना होण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे शेवटी राहुल गांधी कारने नागपूरला पोहचले व रात्री ७.४५ च्या सुमारास चार्टर फ्लाईटने दिल्लीला रवाना झाले.
वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर राहुल गांधी यांची सभा झाली. सभा ठिकाणाच्या बाजूलाच त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले होते. अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव व विदर्भ प्रभारी आशिष दुआ व माजी मंत्री नसीम खान यांचे दुसरे हेलिकॉप्टर सेवाग्रामला उतरले होते. सुमारे ५.५० वाजता सभा आटोपली. सभेनंतर राहुल गांधी हे हेलिकॉप्टरमध्ये बसले. तोवर दुआ व नसीम खान हे सेवाग्रामच्या हेलिपॅडकडे निघाले. त्यांचे हेलिकॉप्टर उडाले मात्र, राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर बराच वेळ प्रयत्न करूनही सुरू झाले नाही. शेवटी त्यांनी कारने नागपूरला येण्याचा निर्णय घेतला. गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे रात्री ७.३० वाजता कारने नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर राहुल गांधी हे चार्टर विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले.