लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा १०,७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.६) करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर ठाण्यांतर्गत गस्तीवर असताना, त्यांना धापेवाडा येथे एक व्यक्ती अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच धाड टाकली. दरम्यान, पाेलिसांना पाहून आराेपी क्रिष्णा वसंता धार्मिक (रा. वाॅर्ड क्र. ४, धापेवाडा) हा पसार झाला. पाेलिसांनी आराेपीच्या घरासमाेरील खाली जागेत तपासणी केली असता, टिनपत्र्याच्या खाली देशी दारूच्या ११७ बाटल्या व विदेशी दारूच्या १३ बाटल्या असे एकूण १०,७९० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी सावनेर पाेलीस ठाण्यात आराेपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सावनेर पाेलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक फाैजदार बाबा केचे, पाेलीस हवालदार चंद्रशेखर घडेकर, राजेंद्र रेवतकर, राेहन डाखाेरे, महिला नायक पाेलीस नम्रता बघेल यांच्या पथकाने केली.