नागपुरातील अयोध्यानगर टपाल कार्यालयातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:15 AM2019-05-16T00:15:29+5:302019-05-16T00:17:08+5:30
रेल्वे मंडळाने प्रवाशांच्या सुविधेकरिता डाक कार्यालयांत रेल्वे आरक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु, शहरातील अयोध्यानगर टपाल कार्यालयातून रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार केला जात होता. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कारवाईमुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५३ हजार ६१५ रुपयाची रेल्वे तिकिटे व रोख ४००० रुपये जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंडळाने प्रवाशांच्या सुविधेकरिता डाक कार्यालयांत रेल्वे आरक्षणाची व्यवस्था केली आहे. परंतु, शहरातील अयोध्यानगर टपाल कार्यालयातून रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार केला जात होता. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कारवाईमुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५३ हजार ६१५ रुपयाची रेल्वे तिकिटे व रोख ४००० रुपये जप्त करण्यात आले.
धर्मेंद्र मनोहर इनकाने (४४) असे आरोपीचे नाव असून तो रेशीमबाग येथील रहिवासी आहे. यशवंत स्टेडियमपुढे त्याचे प्रभात टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून तो रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत होता. अयोध्यानगर टपाल कार्यालय त्याच्या घराजवळ आहे. त्यामुळे तो स्वत: टपाल कार्यालयात जाऊन काऊंटर तिकिटे खरेदी करीत होता. तो २० वर्षापासून या व्यवसायात असून त्याला नियमित ग्राहकांची चांगली माहिती आहे. त्याच्या पॅकेजमध्ये रेल्वे तिकिटाच्या किमतीसह कमिशनचा समावेश रहात होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी टपाल कर्मचाऱ्यांची विचारपूस केली, पण त्यांनी यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. ते सामान्य प्रवाशाप्रमाणे आरोपीला तिकिटे देत होते. त्यामुळे रेल्वेच्या वाणिज्य विभागाने टपाल कर्मचाºयांना यासंदर्भात काही मार्गदर्शन केले की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अयोध्यानगर टपाल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याद्वारे संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवले जाते. परंतु, त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या आरोपीला बुधवारी रेल्वे न्यायालयासमक्ष उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.
आरपीएफ उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन यांच्या नेतृत्वातील चमूने ही कारवाई केली. या चमूत उपनिरीक्षक सी. के. पी. टेंभुर्णीकर, प्रधान आरक्षक एम. एम. इंगळे, प्रकाश रायसेडाम, आर. एस. बागडोरिया, ईशांत दीक्षित, सुभाष आदवारे, धंतोलीचे नायक आरक्षक राजकुमार सोमकुवर व सुनील शिर्के यांचा समावेश होता. याशिवाय दपूम रेल्वेंतर्गतच्या नागभीड, गोंदिया, नैनपूर व छिंदवाडामध्येही १४ मे रोजी कारवाई करण्यात आली. दरम्यान, रेल्वे तिकिटांसह एकूण ३ लाख ३५ हजार ५५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
टपाल कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय
वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीजवळ रेल्वे आरक्षण अर्जाचे दोन पॅड होते. त्यामुळे या गैरव्यवहारात टपाल कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे. टपाल कार्यालयातून मोठ्या संख्येत काऊंटर तिकिटे मिळविण्याची पद्धत आरोपीने अवलंबली होती. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढते. त्यासोबत रेल्वे तिकिटांचा गैरव्यवहारही वाढतो. त्यामुळे रेल्वेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांनीही या मोहिमेत सहभागी होऊ न रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजाराचा भंडाफोड करावा असे आवाहन पांडे यांनी केले.
यांच्यावर झाली कारवाई
- प्रभात टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, धंतोली, नागपूर : ११ लाईव्ह व १७ रद्द काऊंटर तिकिटे, रोख ४००० रुपये यासह एकूण ५७ हजार ६१५ रुपयाचा माल जप्त.
- ऑनलाईन सर्व्हिसेस, डुग्गीपार, गोंदिया : १ लाईव्ह तिकीट, २ जुनी तिकिटे, ८७० रुपये रोख, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल यासह एकूण ५९ हजार ७८४ रुपयाचा माल जप्त.
- प्रोफेशनल कुरियर, बालाघाट, मध्य प्रदेश : १ काऊंटर तिकीट, २२ लाईव्ह तिकिटे यासह एकूण ४६ हजार ७२० रुपयाचा माल जप्त.
- श्रीयंता इंटरनेट, छिंदवाडा : १ लाईव्ह तिकीट, लॅपटॉप, मोबाईल यासह एकूण ६१ हजार ७०० रुपयाचा माल जप्त.
- श्रीयंता इंटरनेट, गुलबरा, छिंदवाडा : ४ लाईव्ह तिकिटे, संगणक, मोबाईल, १६०० रुपये रोख, प्रिंटर यासह एकूण ४४ हजार ६०५ रुपयाचा माल जप्त.
- आस्था टुर्स, मूल : ६ लाईव्ह व ३ जुनी तिकिटे, संगणक, ७०० रुपये रोख, मोबाईल, प्रिंटर यासह एकूण ६४ हजार ६२१ रुपयाचा माल जप्त.